‘सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालया’चा शुभारंभ!
◻️“या संगीत विद्यालयामुळे जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर” - पद्मश्री रघुवीर खेडकर
संगमनेर LIVE | संगमनेर हे अत्यंत सुसंस्कृत व चांगले गाव आहे. या भूमीने कायम संत आणि कलावंतांचा आदर केला आहे. याच परंपरेला साजेसे असे नव्याने सुरू झालेले ‘सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत विद्यालय’ हे संगमनेरच्या व जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर टाकणारे ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केला आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय’ संचलित ‘सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालया’चा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘कला दालना’चेही उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “माझी आई स्वर्गीय कांताबाई सातारकर यांची संगमनेरमध्ये एक चांगले संगीत विद्यालय असावे, अशी खूप मोठी इच्छा होती. आज संगमनेरच्याच सुपुत्राच्या हस्ते या विद्यालयाचा शुभारंभ होत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. संगमनेर हे खूप चांगले गाव असून, येथील लोक अतिशय प्रेमळ आहेत. बाहेरून आलेला प्रत्येक माणूस येथेच स्थिरावतो, हे या गावचे मोठेपण आहे. सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या या गावात नव्याने संगीत विद्यालय सुरू होत असल्यामुळे संगमनेर आणि जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोठी भर पडली आहे.” असे गौरवोद्गार काढले.
आपल्या ५३ वर्षाच्या प्रदीर्घ सांगीतिक आणि कला प्रवासाबद्दल बोलताना खेडकर म्हणाले की, “अनेक गावांमधून मंदिरे, शाळा, दवाखाने, रस्ते यांसह अनेक गरजूंना आजारपणात मदतीचा हात दिला, पण त्याची कधीही जाहिरात केली नाही. तमाशा हा अश्लील नाही, त्याकडे समाजातील घटकांनी चांगल्या आणि निकोप नजरेने पाहण्याची गरज आहे.”
सध्याच्या बदलत्या सांगीतिक परिस्थितीवर खंत व्यक्त करताना ते म्हणाले, “आजच्या काळात चांगले संगीत ऐकायला मिळत नाही, तरुण पिढीला संगीताचे भान आणि ज्ञान राहिलेले नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आगामी काळात जिल्ह्यात व तालुक्यात तमाशा आणि संगीत महोत्सवांचे आयोजन व्हावे," अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपल्या मनोगतात म्हणाले, “संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या रूपाने कलेचे एक नवे दालन सुरू झाले आहे. संगीताला वय, जात, धर्म किंवा पंथाची कोणतीही अट नसते. मानवाला निखळ आनंद देणारी ‘संगीत’ ही निसर्गाची देणगी आहे. भारताला शास्त्रोक्त संगीताचा मोठा वारसा लाभला असून, सर्वाना एकत्र आणण्याची अफाट ताकद संगीतामध्ये आहे. या नव्या विद्यालयातून भविष्यात दर्जेदार कलावंत निर्माण होतील.”
पुढे बोलताना थोरात यांनी खेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. “रघुवीर खेडकर यांना मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार हा संपूर्ण तमाशा विश्वाचा सन्मान करणारा आहे. संगमनेरला हा पुरस्कार मिळाल्याचा आम्हा सर्वाना सार्थ अभिमान आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
संगीत क्षेत्राचा उल्लेख करताना बाळासाहेब थोरात यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. “संगीत क्षेत्र म्हटलं की भारतरत्न लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे नाव सर्वप्रथम येते. लतादीदींच्या हस्ते दादांना (सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यावेळी लतादीदींनी संगमनेरला येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या पाठोपाठ आशा भोसले संगमनेरला आल्या. याशिवाय जावेद अली, शबाना आजमी, विवेक ओबेरॉय यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी संगमनेरला भेट दिली आहे, ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे," असेही थोरात यांनी यावेळी नमूद केले.