‘प्रवरा’ हे ग्रामीण शिक्षणाचे ‘रोल मॉडेल’ - आयपीएस धनंजय दिघे
◻️ विखे पाटील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण
संगमनेर LIVE (लोणी) | ग्रामीण भागामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने शिक्षणाच्या अद्ययावत सुविधा निर्माण केल्यामुळे आज गोरगरीब जनतेची मुलेही स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवत आहेत. ग्रामीण विद्यार्थी हा मुळातच सर्वगुणसंपन्न असतो. आपले ध्येय निश्चित करून त्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करण्याची जिद्द आणि त्याला ‘प्रवरे’च्या माध्यमातून मिळणारे प्रोत्साहन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ‘प्रवरा’ संस्था ही खऱ्या अर्थाने ग्रामीण शिक्षणासाठी एक ‘रोल मॉडेल’ ठरली आहे, असे गौरवउद्गार भारतीय पोलीस सेवेत (IPS) निवड झालेले अधिकारी धनंजय दिघे यांनी काढले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या ‘वार्षिक पारितोषिक वितरण आणि क्रीडा दिनानिमित्त’ आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दिघे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, डॉ. प्रदीप दिघे, डॉ. आर. ए. पवार, भास्कर खर्डे, भारत घोगरे, डॉ. महेश खर्डे, डॉ. आर. एस. पवार, डॉ. बी. के. वाणी, डॉ. राहुल उबाळे, डॉ. भाऊसाहेब रणपिसे, डॉ. राजेंद्र सलालकर आदीसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्याशी संवाद साधताना धनंजय दिघे म्हणाले की, “आज विद्यार्थ्यासमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रवरेमध्ये शिक्षणाबरोबरच इतर दर्जेदार सुविधा मिळत असल्याने येथील विद्यार्थी कौशल्यसंपन्न होत आहे. विद्यार्थ्यानी आता जाणीवपूर्वक स्पर्धा परीक्षांकडे वळले पाहिजे. मात्र, हे करत असताना आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे आधी ठरवा आणि त्यादृष्टीने सातत्याने तयारी करा. परीक्षेत अपयश आले तरी खचून जाऊ नका, कारण अपयशातूनच यशाचा मार्ग सापडतो. अभ्यासाचे निश्चित धोरण ठरवा, सोशल मीडियापासून दूर राहा, मोठी स्वप्ने बघा आणि स्वतःमधील आत्मविश्वास व सकारात्मकता नेहमी जपा.” असे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सडेतोड भाष्य केले. त्या म्हणाल्या, “वडगाव पान येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. प्रवरेमध्ये मुली पूर्णपणे सुरक्षित आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत महिला आणि मुलींचा आदर करायला हवा. जर कोणी मुलींना त्रास देत असेल, तर प्रसंगी त्याला धडाही शिकवला पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी प्रवरेच्या विद्यार्थ्यानी पुढाकार घ्यावा.” असे नमूद केले.
‘दत्तक विद्यार्थी योजने'तून मिळणार करिअरला दिशा
बदलते तंत्रज्ञान आणि स्पर्धेचे युग लक्षात घेऊन डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी एका अभिनव उपक्रमाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “प्रवरेचा विद्यार्थी स्पर्धेत टिकून पुढे जावा यासाठी तांत्रिक व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यामार्फत माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना ‘दत्तक’ घेतले जाईल. या दत्तक विद्यार्थी योजनेतून कनिष्ठ विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शन, भविष्याची वाटचाल, सोशल मीडियाचा गैरवापर टाळण्याचे धडे आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार दिले जातील.” असे सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सायबर गुन्हेगारीबाबत विद्यार्थ्याना सतर्क केले. ते म्हणाले, “सध्या सोशल मीडियामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे युवकांनी, विशेषतः मुलींनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जपून आणि कमीत कमी करावा. आपले आई-वडील आपल्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करत असतात. केवळ सोशल मीडियावरील एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांचे कष्ट वाया घालवू नका. हे तुमचे शिक्षणाचे वय आहे, केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करून पुढे जा.” असे आवाहन केले.
दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. प्रदीप दिघे यांनी महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय डॉ. आर. ए. पवार यांनी करून दिला. यावेळी वर्षभरात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याचा आणि प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले तर पी. सी. गलांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.