अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्याना परीक्षा शुल्कात सवलतीसाठी दाखले द्या!

संगमनेर Live
0
अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्याना परीक्षा शुल्कात सवलतीसाठी दाखले द्या!

◻️ भाजपचे गोकुळ दिघे यांची तहसीलदाराकडे मागणी 


​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील यंदाच्या अतिवृष्टीने शेतीसह जनजीवनाचे प्रचंड नुकसान केले आहे. या नैसर्गिक संकटामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून प्रशासनाने जोर्वे, कोल्हेवाडी, वाघापूर, रायते, रहिमपूर, मनोली, ओझर खुर्द, उंबरी बाळापूर, पानोडी, हंगेवाडी, ओझर बुद्रुक, कनकापुर, कनोली, पिंपरणे, डिग्रस, मालुंजे, अंभोरे आणि कोळवाडे या गावांना अधिकृतपणे अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित केले आहे. 

या पार्शभुमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील नोव्हेंबर २०२५ सत्राच्या परीक्षा शुल्कात या गावांतील विद्यार्थ्यांना फी माफी जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. विद्यापीठाच्या ५ मार्च २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याना मोठी मदत होणार आहे.

​मात्र, या सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याना आपल्या गावाचा ‘अतिवृष्टीग्रस्त’ असल्याचा अधिकृत दाखला महाविद्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सद्यस्थितीत अनेक विद्यार्थ्याकडे हा दाखला उपलब्ध नसल्यामुळे त्यांना या महत्त्वाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, तालुक्यातील काही ठिकाणी तलाठी हे दाखले देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. प्रशासकीय स्तरावर होणाऱ्या या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने या प्रश्नाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

​या गंभीर बाबीची दखल घेत भाजपचे आश्‍वी मंडळ अध्यक्ष गोकुळ दिघे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून, संबंधित गावांतील तलाठ्यांना तातडीने आदेश देऊन विद्यार्थ्याना आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करावी, जेणेकरून एकही पात्र विद्यार्थी या योजनेपासून केवळ कागदपत्रांअभावी वंचित राहणार नाही, यावर त्यांनी जोर दिला आहे.

दरम्यान अतिवृष्टीमुळे आधीच हवालदिल झालेल्या विद्यार्थ्याच्या हितासाठी प्रशासनाने आता तातडीने सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तर, ​प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे आता तालुक्यातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !