नैसर्गिक शेती हीच भविष्यातील समृद्धीची गुरुकिल्ली - डॉ. गगनेश शर्मा

संगमनेर Live
0
नैसर्गिक शेती हीच भविष्यातील समृद्धीची गुरुकिल्ली - डॉ. गगनेश शर्मा

◻️ बाभळेश्‍वर येथील कार्यशाळेत २०० हून अधिक प्रयोगशील शेतकरी सहभागी


संगमनेर LIVE (​लोणी) | केंद्र सरकारच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला मोठे प्रोत्साहन दिले जात असून, शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन न घेता विक्री व्यवस्था समजून घेण्याची गरज आहे. बाभळेश्‍वरच्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्य नैसर्गिक तसेच सेंद्रिय शेतीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असून, या भागात नैसर्गिक शेतीची एक मोठी लोकचळवळ उभी राहत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती संस्था, गाझियाबादचे संचालक डॉ. गगनेश शर्मा यांनी केले.

राहाता तालुक्यातील बाभळेश्‍वर येथील कृषि विज्ञान केंद्रात ‘प्रादेशिक सेंद्रिय व नैसर्गिक शेती संस्था, नागपूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ही कार्यशाळा नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, डॉ. उत्तमराव कदम आणि डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली.

​कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. शर्मा पुढे म्हणाले की, नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि ग्राहकांना विषमुक्त, निरोगी अन्न मिळते. या शेती प्रकारात प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी असून शेतकऱ्यांनी विपणन व्यवस्था आत्मसात करणे काळाची गरज आहे. नागपूर येथील प्रादेशिक केंद्र हे भारत सरकारच्या कृषि मंत्रालयांतर्गत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या सहा राज्यांमध्ये तांत्रिक मार्गदर्शनाचे काम करते. या कार्यशाळेच्या निमित्ताने शेतकरी, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ आणि विपणन तज्ज्ञ एकाच व्यासपीठावर आल्याने नैसर्गिक शेतीवर सखोल विचारमंथन करण्यात आले.

​कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती संदर्भात केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध प्रायोगिक उपक्रमांची माहिती दिली, तर शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे यांनी नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध निविष्ठा आणि उत्पादने तयार करण्याच्या पद्धतींचे सविस्तर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन दिले. 

याप्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून सुमारे २०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

​याप्रसंगी नागपूर केंद्राचे संचालक डॉ. अजयसिंग राजपूत, सहयोगी शास्त्रज्ञ डॉ. स्वप्निल मगर, डॉ. विलास घुले, डॉ. प्रियांका खर्डे, डॉ. विठ्ठल विखे, संज्जला लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रियांका खर्डे यांनी केले, तर डॉ. विलास घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !