वडगाव पान येथील चिमुकलीवरील ॲसिड हल्ल्यानंतर जनक्षोभाचा उद्रेक!
◻️ जयश्री थोरात, नीलम खताळ यांच्या उपस्थितीत तळेगाव फाटा येथे भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन
संगमनेर LIVE | शाळेत जाणाऱ्या अवघ्या १२ वर्षाच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या अमानवीय ॲसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण संगमनेर तालुका सुन्न झाला आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिक, महिला, युवक आणि शेकडो विद्यार्थिनींनी एकत्र येत तळेगाव फाटा येथे भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे संगमनेरच्या तीनही बाजूंची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनी प्रशासनावर आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, “हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो, पण गेल्या काही दिवसांतील घटना पाहता महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडतोय. परवा चाकू हल्ला आणि काल ॲसिड हल्ला! त्या लहान मुलीची अवस्था पाहून हृदय पिळवटून निघतेय. तिचा चेहरा आणि डोळा निकामी झाला असून ती वेदनेने विव्हळत आहे.” त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, या नराधम आरोपीचा शोध घेऊन त्याला अशी अद्दल घडवणारी शिक्षा द्यावी, ज्यामुळे भविष्यात कोणाचीही अशी कृती करण्याची हिंमत होणार नाही. तसेच महाविद्यालय, शाळा आणि मुख्य रस्त्यांवर तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून पोलिसांनी आपली गस्त वाढवावी, जेणेकरून विद्यार्थिनी निर्भयपणे वावरू शकतील, असे सांगितले.
सौ. नीलम खताळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ही घटना केवळ एका कुटुंबावरचा आघात नसून संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. “आमदार अमोल खताळ यांनी या गंभीर घटनेची दखल घेत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यासोबतच पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
घटनेच्या प्राथमिक तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, त्या परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने पोलिसांना आरोपीचा मागमूस काढणे कठीण जात आहे. यावरून ग्रामीण भागातील सुरक्षा किती रामभरोसे आहे, हे स्पष्ट होते. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आता तरी जागे होऊन गावातील प्रमुख चौक आणि शाळांच्या बाहेर सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
आंदोलनस्थळी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी भेट देऊन संतप्त आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, पोलीस प्रशासन सर्व उपलब्ध तांत्रिक यंत्रणा आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपीच्या मागावर असून, अत्यंत संवेदनशीलतेने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच गुन्हेगाराला जेरबंद करून कायद्याच्या चौकटीत उभे केले जाईल, असे सांगितले. यानंतर आंदोलकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन स्थगित करण्यात आले.