​जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

संगमनेर Live
0
जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

◻️ शिवसेनेचे अभिजीत पोटे यांनी मांडले ‘व्हाईट लाईट्स’ अपघातांचे दाहक वास्तव


संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढते रस्ता अपघात आणि त्यात दगावणाऱ्या नागरिकांची संख्या ही सध्या अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. या गंभीर विषयावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात रस्ता सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील २२ प्रमुख नोडल अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेनचे (शिंदे गट) युवा नेते अभिजीत पोटे यांनी जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेबाबत प्रशासनासमोर धक्कादायक वस्तुस्थिती मांडली.

​बैठकीत बोलताना अभिजीत पोटे यांनी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांच्या कारणांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, वाहनांना बसवलेले नियमबाह्य ‘हाय केल्विन पॉवर'चे पांढरे लाईट्स अपघातांना निमंत्रण देत आहेत. चिनी आणि जर्मन कंपन्यांचे हे प्रखर दिवे समोरून येणाऱ्या वाहनचालकाचे डोळे दिपवतात, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात घडत आहेत. अशा दिव्यांची विक्री करणाऱ्या दुकानदार आणि एजन्सीवर पोलिसांनी थेट धाडी टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या कारवाईचे ‘रील्स’ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करावेत, जेणेकरून वाहनधारकांमध्ये नियमांचा धाक निर्माण होईल, असेही त्यांनी सुचवले.

​महामार्गावरील त्रुटींचा पाढा वाचताना पोटे यांनी नगर-पुणे महामार्गावरील ‘अंधेर नगरी'कडे सर्वांचे लक्ष वेधले. या महामार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत ‘डिवायडर गॅप’ असून वारंवार सांगूनही ते बुजवले गेलेले नाहीत. डिवायडरची उंची कमी झाली असून त्यावर अ‍ॅटी - रिफ्लेक्टर, कटर बोर्ड किंवा झाडे देखील नाहीत. विशेष म्हणजे, सुपा, बेलवंडी आणि राळेगण फाटा यांसारख्या ठिकाणी शासनाचे दिशादर्शक आणि अंतर दर्शवणारे फलक खाजगी जाहिरातींनी वर्षभर झाकलेले असतात. यामुळे बाहेरील प्रवाशांची दिशाभूल होऊन अपघातांचा धोका वाढतो, याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष वेधले.

​बैठकीत ७ आणि ८ मार्च दरम्यान झालेल्या पाच भीषण अपघातांचा उल्लेख करण्यात आला, ज्यात ३५ वर्षापेक्षा कमी वयाच्या पाच नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. ७ मार्च रोजी पवारवाडी घाटात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर ८ मार्चला सकाळी चास गावाजवळ, सायंकाळी हॉटेल माथेरानसमोर आणि दुपारी नेप्ती फाटा येथे विविध अपघातांत चार जणांचा बळी गेला. तसेच नगर-दौंड हायवेवरील कोळगाव फाट्याजवळ झालेल्या ट्रक आणि टँकरच्या अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघाताच्या चौकशीत एका वाहनाची लाईट बंद असणे आणि दुसरे वाहन अतिवेगात असणे ही प्रमुख कारणे समोर आली आहेत.

​अहिल्यानगर शहरातील वाहतूक कोंडीबाबत बोलताना पोटे यांनी सावेडीतील पत्रकार चौक, पाईपलाईन रोड आणि भिस्तबाग नाका परिसरातील अतिक्रमणांवर बोट ठेवले. हॉटेल व्यावसायिकांच्या ग्राहकांची वाहने भररस्त्यात उभी राहत असल्याने महामार्गाची एक लेन पूर्णपणे बंद होते, ज्यामुळे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मोठी कोंडी होते. या बेशिस्त पार्किंगवर आणि बेकायदेशीर जाहिरात फलकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

दरम्यान आरटीओ आणि पोलिसांनी केवळ दंड न आकारता, प्रभावी जनजागृतीसाठी कारवाईचे व्हिडिओ प्रसारित करावेत, अशी आग्रही मागणी करत अभिजीत पोटे यांनी रस्ते सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !