निर्मळ पिंपरी येथे गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरसह ९ जण जेरबंद
◻️ अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची धडक कारवाई
पिंपरी निर्मळ येथील निळवंडे कॅनॉल शेजारी असलेल्या एका खोलीत महिलांकडून १० हजार रुपये घेऊन गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक ‘बनावट गरोदर महिला ग्राहक’ तयार करून त्या ठिकाणी पाठवली. तेथे गर्भलिंग निदान सुरू असल्याची खात्री होताच, दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या घराववर छापा टाकला.
पोलिसांनी छापा टाकला असता, त्या ठिकाणी डॉक्टर आणि एजंट हे विनापरवाना पोर्टेबल यु.एस.जी (सोनोग्राफी) मशीनच्या सहाय्याने तपासणी करताना आढळले. चौकशीत त्यांनी कबूल केले की, ते प्रत्येक महिलेकडून १० हजार रुपये घेऊन गर्भात मुलगा आहे की मुलगी याची माहिती देत असत. विशेष म्हणजे, तपासणीसाठी आलेल्या ८ महिला या बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव आणि पुणे येथून आल्या होत्या. या सर्व महिला ३ ते ४ महिन्यांच्या गरोदर असून त्यांना स्विफ्ट, एर्टिगा आणि वॅगनआर कारमधून या ठिकाणी आणण्यात आले होते.
या धाडसी कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे 'लाईफ प्लस' कंपनीचे यु.एस.जी मशीन, लॅपटॉप प्रोब आणि चार्जर जप्त केले आहे. यासोबतच ५९ हजार रुपयांची रोकड, ४ मोबाईल फोन, गर्भलिंग तपासणीसाठी वापरले जाणारे जेल, टिश्यू पेपर आणि काही कागदी चिठ्ठ्या असा साहित्य साठाही पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार, पांढऱ्या रंगाची एर्टिगा आणि लाल रंगाची वॅगनआर अशा तीन महागड्या गाड्यांसह एकूण २४ लाख ९ हजार १०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
गर्भलिंग निदान कायद्याने बंदी असतानाही, विना नोंदणीकृत मशीन वापरून आणि कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना हा बेकायदेशीर व्यवसाय आर्थिक फायद्यासाठी सुरू होता. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालय लोणीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी डॉक्टर आणि एजंटसह एकूण ९ आरोपींना अटक केली असून पुढील तपास लोणी पोलीस करत आहे.
दरम्यान, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, कोमल कुमावत, बेबी आण्णा शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, संदिप दरंदले, सचिन धनाड, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे, राजेंद्र बिरदवड, पोलीस हेड कॉन्स्टेबल असिर सय्यद, साइनाथ राशिनकर, पोलीस नाईक सचिन शेवाळ, पोलीस कॉन्स्टेबल भोईटे, मनिषा गिरी यांच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.