शिक्षण आणि समतेचा विचार कृतीत आणण्यासाठी कटिबध्द व्हा - मंत्री विखे पाटील
◻️ महात्मा फुले यांचें द्विशताब्दी वर्ष ‘सामाजिक समता व समरसता वर्ष’ म्हणून साजरे होणार!
संगमनेर LIVE (लोणी) | क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष राज्य सरकारने ‘सामाजिक समता व समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा असून, सामाजिक परिवर्तनासाठी त्यांच्या विचारांची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नामदार विखे पाटील यांनी लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, महात्मा फुले यांचे संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाची संधी दिली, ज्यातूनच खऱ्या अर्थाने स्त्री-शिक्षणाचा पाया मजबूत झाला. त्यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नव्हते, तर समाजातील प्रत्येक घटकाच्या न्यायासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड' ओढून शोषणाविरुद्ध आवाज उठवला आणि दीन-दलित, वंचित घटकांना न्याय मिळवून दिला.
समजातील विषमतेवर केवळ प्रहार न करता, आपल्या कृतीतून त्यांनी समानतेचा आदर्श घालून दिला. पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःच्या घरातील हौद सर्वांसाठी खुला करणे, हा त्या काळातील एक क्रांतिकारी आणि समानतेचा संदेश देणारा निर्णय होता. आजही समाजामध्ये अंधश्रध्देमुळे अनेक लोकांची फसवणूक होत आहे, अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी मांडलेली प्रखर मते समाजाला आजही दिशा देणारी आहेत. शिक्षणासोबतच समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा वारसा आपल्याला आता अधिक जोमाने पुढे न्यावा लागेल, अशी अपेक्षाही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्य सरकारने हे २०० वे जयंती वर्ष ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष' म्हणून साजरे करण्याचा जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, त्या माध्यमातून महात्मा फुलेंचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आपण सर्वानी कटिबद्ध होऊन काम करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.