अंधश्रध्दाग्रस्त मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांच्या हकालपट्टी करा!
◻️ राज्यातील २१ जिल्ह्यांत माकपची तीव्र निदर्शने
संगमनेर LIVE | भोंदूबाबा अशोक खरात याने तंत्र-मंत्र आणि अंगारे-धुपारे यांच्या नावाखाली महिला व सामान्य जनतेचे केलेले शोषण आणि या संपूर्ण प्रकरणात लोकप्रतिनिधींचा असलेला सहभाग, याविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने ६ एप्रिल २०२६ रोजी राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात आले. या भोंदूगिरीला साथ देणाऱ्या मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अशोक खरात याने श्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांचे शोषण केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या कारस्थानात राज्यातील ३९ आमदारांसह अनेक मंत्री, महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि वरिष्ठ अधिकारी सामील असल्याचे किंवा बळी पडल्याचे समोर येत आहे. ज्यांच्याकडे संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तेच लोक वैज्ञानिक दृष्टिकोन विसरून अंधश्रध्देचे समर्थक आणि वाहक बनले आहेत, असा गंभीर आरोप माकपच्या वतीने करण्यात आला.
या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये माकपच्या वतीने मोर्चे आणि निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी संतापलेल्या जनतेने भोंदूगिरीचे समर्थन करणाऱ्यांचे पुतळे जाळले. “श्रध्देच्या नावाखाली सुरू असलेला हा व्यभिचार आणि शोषण खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा कार्यकर्त्यानी दिला.
या आंदोलनाद्वारे माकपचे नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी शासनाकडे आक्रमक मागण्या मांडल्या आहेत. भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या सर्व साथीदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याची सर्व मालमत्ता जप्त करावी व ती अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यासाठी वापरण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. या भीषण शोषणात सामील असलेल्या ३९ आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे तात्काळ राजीनामे घेण्यात यावेत, तसेच सोशल मीडियावर पीडित महिलांची बदनामी करणारे आक्षेपार्ह व्हिडिओ त्वरित हटवून त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचे रक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच राज्यातील भोंदूगिरीचे पीक नष्ट करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष’ स्थापन करून जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आणि सोशल मीडियावरून होणाऱ्या अंधश्रद्धाळू जाहिरातींवर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
“राज्यकर्त्यानी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याऐवजी धर्म आणि जातीवर आधारित अंधश्रध्देला बळ दिले आहे. यामुळेच गावागावात भोंदू बाबांचे पीक आले आहे. शासनाने यावर विशेष मोहीम राबवून सर्व भोंदूगिरीचा बंदोबस्त करावा.” असे आवाहन कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी केले.
दरम्यान राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि विवेकवादाच्या संरक्षणासाठी माकपचा हा लढा यापुढेही सुरू राहील, असा ठाम निर्धार या आंदोलनाद्वारे व्यक्त करण्यात आला.