प्रा. बाबासाहेब गवते यांचा राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने गौरव
◻️ आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान
संगमनेर LIVE (लोणी) | समता प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात, शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अखंड आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. बाबासाहेब जालिंदर गवते यांना यंदाचा मानाचा “महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. मुळचे वांबोरी (ता. राहुरी) येथील रहिवासी असलेले प्रा. गवते सध्या नोकरीनिमित्त लोणी (ता. राहाता) येथे स्थायिक असून, त्यांच्या या यशाने दोन्ही ठिकाणी आनंदाचे वातावरण आहे.
संगमनेर येथे रविवारी (दि. ५) अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात हा पुरस्कार सोहळा पार पडला. राज्याचे तरुण आणि अभ्यासू विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते प्रा. गवते यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रा. गवते यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “समाज घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका हा मुख्य कणा मानली जाते. प्रा. बाबासाहेब गवते यांनी केवळ ज्ञानदानच केले नाही, तर आपल्या कर्तृत्वातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची पहाट आणली आहे. अशा निष्ठावान आणि समर्पित शिक्षकाचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्यच आहे. त्यांचे कार्य आगामी पिढीतील शिक्षकांसाठी निश्चितच दीपस्तंभासारखे प्रेरणादायी ठरेल.” अशा भावना व्यक्त केली.
मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाला उत्तर देताना प्रा. बाबासाहेब गवते भावूक झाले होते. ते म्हणाले की, “हा पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नसून, माझ्यावर प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्याच्या आणि सहकाऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. हा सन्मान मी माझ्या लाडक्या विद्यार्थ्याना समर्पित करतो.”
दरम्यान, या सोहळ्याला शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर, प्रा. गवते यांचे लोणी, वांबोरी आणि राहुरी परिसरातील विविध संस्था, संघटना आणि ग्रामस्थं आणि मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.