कार्यकर्त्याच्या समर्पित भावनेमुळेच भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष!
◻️ ४६ व्या स्थापना दिनानिमित्त लोणी येथे नामदार विखे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण
संगमनेर LIVE (लोणी) | भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून, तो एक विचार आहे. अंत्योदय चळवळ ते विकसित भारत असा पक्षाच्या वाटचालीचा यशस्वी प्रवास जनतेच्या दृढ विश्वासाने सुरू असून, भविष्यात पक्षाचा जनाधार अधिक भक्कम होण्यासाठी कार्यकर्त्यानी गाव पातळीवर पक्षाचा विचार पोहचविण्यासाठी काम करावे. असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह विविध संस्थाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण झाली आहे. यामागे समर्पित भावनेन काम करणाऱ्या कार्यकत्याचे मजबूत संघटन असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी केला.
भारत देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी भाजपने नेहमीच राष्ट्र प्रथम ही भूमिका घेवून काम केले. लोकांच्या हक्कासाठी संघर्ष आणि विकासाच्या प्रक्रीयेसाठी पक्षाचे धोरण राहील्याने ४६ वर्षाची यशस्वी वाटचाल जनतेच्या पाठबळावर अधिक मजबूत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सलग तीनवेळा भाजपची सत्ता येणे हे पक्षाच्या योग्य आशा राष्ट्रीय धोरणाचे, लोकाभिमुख निर्णयाची यशस्विता असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, विकसीत भारताच्या भविष्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली वाटचाल देशाच्या उज्वल भवितव्याचे द्योतक आहे.
‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राने समाजातील शेवटचा माणूस विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून निर्णय होत आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सलग तीन वेळा भाजपला मिळालेले यश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही प्रथम क्रमांकाचे मिळालेले यश हे जनतेच्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.