तळेगाव दिघे येथील पोलीस पाटील निलंबित!
◻️ उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांची कारवाई
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे (आजमपूर) येथील कामगार पोलीस पाटील अनिल रावजी कांदळकर यांना शासकीय कामकाजात वारंवार हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांनी तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. या कारवाईमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कांदळकर हे पोलीस पाटील म्हणून आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून वारंवार प्रशासनाकडे येत होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांनी तहसीलदार आणि संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते.
प्रशासकीय स्तरावर झालेल्या या चौकशीत कांदळकर यांच्या कामकाजातील अनेक त्रुटी आणि निष्काळजीपणा पुराव्यानिशी समोर आला. कर्तव्याप्रती असलेला बेजबाबदारपणा सिध्द झाल्याने, प्राप्त चौकशी अहवालाच्या आधारे उपविभागीय अधिकाऱ्यांनी निलंबनाचे कठोर पाऊल उचलले आहे.
दरम्यान, या कारवाईतून कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.