वारकरी संप्रदायात मानवता आणि समतेचा विचार - बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहाला भेट
संगमनेर LIVE | “शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला वारकरी संप्रदाय हा सर्व समाजाला एकत्र आणणारा अखंड स्रोत आहे. संत ज्ञानेश्वरांनी रचलेले ‘पसायदान’ केवळ काव्य नसून ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना आहे. आजच्या युध्दाच्या आणि अस्वस्थ वातावरणात जगाला पसायदानाचा विचारच तारू शकतो.” असे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर खुर्द येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व आणि संतांच्या शिकवणुकीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमात ह.भ.प. कविराज महाराज झावरे यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कधीही भेदभाव केला जात नाही. या संप्रदायात अठरापगड जाती-धर्माचे संत एकत्र आले असून संत चोखोबा, संत गोरा कुंभार, संत नामदेव आणि संत नरहरी सोनार यांसारख्या महात्म्यांनी समाजाला समतेचा आणि शुध्द मानवतेचा विचार दिला आहे.
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानेश्वरी आणि पसायदानाची निर्मिती केली, जे दुष्ट प्रवृत्ती नष्ट करून सर्वाच्या जीवनात सुख-समृद्धी आणण्यासाठी मार्गदर्शक ठरते. केवळ पुरुष संतच नव्हे, तर संत चोखामळा यांच्या पत्नी सोयराबाई यांनी लिहिलेला ‘अवघा रंग एक झाला’ हा अभंग आजही मानवतेचे श्रेष्ठत्व सिद्ध करतो.
विशेष म्हणजे, या संप्रदायात अंगारे-धुपारे, गंडे-दोरे किंवा कोणत्याही प्रकारच्या बुवाबाजीला अजिबात स्थान नसून हा केवळ शुध्द भक्ती आणि उच्च विचारांचा मार्ग आहे. हाच समतेचा विचार आपल्याला जपायचा असून, सर्वाना सोबत घेऊन समाजाला प्रगतीपथावर न्यायचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान या सोहळ्याला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.