प्रवरेतील विद्यार्थिनींच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे १४.५० लाखांचे अनुदान

संगमनेर Live
0
प्रवरेतील विद्यार्थिनींच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे १४.५० लाखांचे अनुदान

◻️ ​अंध बांधवांना वस्तू ओळखण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान निर्मिती स्टार्टअप 

संगमनेर LIVE (​लोणी) | लोणी येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या सायली बहिरट या विद्यार्थिनीने ‘व्हिसुबॉट’ नावाचा एक विशेष प्रकल्प तयार केला असून, या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) १४ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

‘एमएसएमई आयडिया हॅकाथॉन ५.०’ या स्टार्टअप योजनेअंतर्गत ही निवड करण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या कल्पकतेला मिळालेली ही मोठी पावती आहे.

​या यशाबद्दल माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या देशभरात स्टार्टअप आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले जात आहे. सायलीने तयार केलेला हा प्रकल्प अंध व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे एक ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान असून, ते अंध वापरकर्त्याला त्याच्या समोर कोणती वस्तू आहे याची माहिती रिअल-टाइममध्ये (तात्काळ) करून देते. यामुळे अंध बांधवांना कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या परिसरातील वस्तू ओळखणे सोपे होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे उद्योग उभे करावेत, या उद्देशाने संस्थेत अत्याधुनिक ‘आयडिया लॅब' आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

​संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रिझम फोरम'च्या माध्यमातून ग्रामीण संशोधकांना सातत्याने बळ दिले जात आहे. या विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कुरकुटे यांनी सांगितले की, आतापर्यंत ग्रामीण भागातील ५ स्टार्टअप्सची नोंदणी झाली असून, प्रत्येकी १५ लाखांपर्यत आर्थिक मदत सरकारमार्फत मिळवून दिली जात आहे. सायलीचा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्ष उपयोगात येणार असून, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. कोरडे यांनी तिला या संशोधनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

​आपल्या यशाचा आनंद व्यक्त करताना सायली बहिरट म्हणाली की, “महाविद्यालयाने दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी हा प्रकल्प पूर्ण करू शकले. मिळालेल्या अनुदानातून अंध बांधवांसाठी स्वस्त आणि प्रभावी साधन विकसित करणे आता सोपे होईल.” 

सायलीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, डॉ. सुजय विखे, डॉ. सुस्मिता विखे आणि संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !