लोणी खुर्द येथे पर्यावरण पुरक १.४३ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

संगमनेर Live
0
लोणी खुर्द येथे पर्यावरण पुरक १.४३ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

◻️​ डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील पहिली अत्याधुनिक पशुदाहिनी आणि सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित

संगमनेर LIVE (​लोणी) | राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील चिकन-मटण मार्केट परिसरात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळाली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सुमारे १ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या दोन महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे लोकार्पण संपन्न झाले.

यामध्ये ५० लाख रुपये खर्चाची अत्याधुनिक पशुदाहिनी आणि ९३ लाख रुपये खर्चाचा सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प यांचा समावेश आहे. हे दोन्ही प्रकल्प जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आले आहेत.

​यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “अहिल्यानगर जिल्ह्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून स्वच्छता व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे एक क्रांतीकारक पाऊल आहे. मार्केटमधील अवशेषांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेली ही पशुदाहिनी पूर्णपणे अत्याधुनिक आहे.”

​या प्रकल्पांच्या माध्यमातून ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेचा प्रत्यय येणार असून, पशुदाहिनीत अवशेषांची विल्हेवाट लावल्यानंतर तयार होणाऱ्या राखेचा उपयोग भविष्यात सेंद्रिय खत म्हणून केला जाणार आहे. यामुळे केवळ कचऱ्याची समस्या सुटणार नाही, तर शेतीसाठी पूरक खतही उपलब्ध होणार आहे.

सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पामुळे परिसरातील जलस्रोत प्रदूषित होण्यापासून वाचतील, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल. या सर्व सोयींमुळे परिसरात पसरणारी दुर्गधी आणि अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या आजारांना आळा बसणार असून, स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मोठी मदत होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प जिल्ह्यासाठी पर्यावरण स्नेही व्यवस्थापनाचा एक उत्तम आदर्श ठरणार आहे.

​या सोहळ्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्‍वर गोंदकर, राहुल धावणे, दत्तात्रय गोरे, दिलीप गाडेकर, एस. मोटे यांच्यासह परिसरातील व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमादरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, शासन आधुनिक सुविधा आणि पर्यावरण संरक्षणासाठी पूर्णपणे कटिबध्द आहे.

दरम्यान, लोणी परिसरात राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ स्वच्छतेसाठी नसून तो शाश्‍वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे लोणी खुर्दचे मार्केट आता अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि हायटेक होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !