“साखर कारखानदारी टिकवण्यासाठी उत्पादकता वाढवणे काळाची गरज”
◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे जोर्वे येथील ऊस विकास मेळाव्यात शेतकऱ्यांना आवाहन
संगमनेर LIVE | दूध आणि ऊस ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची शाश्वत आधारस्तंभ असलेली पिके असून ती आपण जपली पाहिजेत. मात्र, सध्या केंद्र सरकारचे साखर निर्यात धोरण आणि खासगी कारखान्यांची वाढती संख्या यामुळे सहकारी साखर कारखानदारी कठीण कालखंडातून जात आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत शेतकऱ्यांनी केवळ उसाचे क्षेत्र न वाढवता, एकरी उत्पादकता १०० टनांपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जोर्वे येथे आयोजित ‘ऊस विकास वाढ मेळाव्यात' ते बोलत होते.
साखर कारखानदारी समोरील अडचणींवर भाष्य करताना थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. जर ही कारखानदारी कोलमडली, तर त्याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊन ती कोलमडेल. आज अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली असून बाजारात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
आपल्या कारखान्याने अल्कोहोल निर्मिती, वीज निर्मिती आणि काटकसरीच्या धोरणामुळे आपली विश्वासार्हता टिकवून ठेवत चांगली वाटचाल सुरू ठेवली आहे, मात्र आगामी काळात ही प्रगती टिकवण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे. तालुक्यातील शेतीच्या पाणी आणि विजेच्या प्रश्नांवर बोलताना थोरात यांनी प्रशासकीय धोरणांवर कडक ताशेरे ओढले.
ते म्हणाले की, दुष्काळी भागासाठी आपण निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले असून सध्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सुरू आहे. मात्र, शेतीसाठी रोटेशन काळात न्यायालयाच्या निर्णयानुसार ११ तास वीज मिळणे अपेक्षित असताना सध्या केवळ ५ ते ६ तास वीज दिली जात आहे. तरीही सर्वजण गप्प आहेत, हे योग्य नाही. तालुक्यातील हक्काचे पाणी आणि पूर्ण वेळ वीज मिळालीच पाहिजे, यासाठी सर्वांनी आता एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे.
देशातील सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल खंत व्यक्त करताना थोरात म्हणाले की, सध्या केवळ धर्माच्या नावावर राजकारण सुरू असून विविध भूलथापांमुळे शेती, वीज आणि पाणी यांसारख्या जनतेच्या मूळ विषयांकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. अशा काळात शेतकऱ्यांनी आपल्या हिताच्या प्रश्नांवर जागरूक राहणे आवश्यक आहे. थोरात कारखान्यावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असून आपण सातत्याने चांगला भाव देऊन त्यांचे हित जपले आहे. आगामी काळात 'मिशन १०० टन' यशस्वी करण्यासाठी कारखान्याचा कृषी व ऊस विकास विभाग शेतकऱ्यांना सर्वतोपरी तांत्रिक मदत करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, या मेळाव्यात मृदा शास्त्रज्ञ डॉ. अभिनंदन पाटील यांनी उसाच्या वाढीसाठी जमिनीचे आरोग्य आणि खत व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुधीर तांबे, डॉ. अशोक कडलग यांच्यासह कार्यक्षेत्रातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि ऊस उत्पादक उपस्थित होते.