सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी पशुपालकांना मिळणार ३ लाखांपर्यत कर्ज

संगमनेर Live
0
सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी पशुपालकांना मिळणार ३ लाखांपर्यत कर्ज

◻️ दूध उत्पादकांना राज्य शासनाचे आर्थिक पाठबळ - आमदार अमोल खताळ 


संगमनेर LIVE | ​महाराष्ट्र शासन पशुपालक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पशुसंवर्धन विभागामार्फत ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे पशुपालक शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने ३ लाखांपर्यंत अर्थसाहाय्य मिळणार असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.

​आमदार अमोल खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ दूध उत्पादक शेतकरी, शेळी-मेंढीपालक, कुक्कुटपालक आणि वराहपालकांना घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या पशुपालकांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून दिले जाणार असून, दूध संस्थेच्या हमीवर ही मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढविता येते. कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ३ टक्के आणि राज्य शासनाकडून ४ टक्के अशी एकूण ७ टक्के व्याज सवलत मिळते, तर उर्वरित २ टक्के सवलत बँकांकडून दिली जाते. त्यामुळे, नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदाराला शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळतो. जे पशुपालक दूध सोसायटी, दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपनीचे सभासद आहेत, असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

“पशुपालक हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांना सावकारीच्या पाशातून मुक्त करून त्यांच्या व्यवसायाला भांडवली बळ देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे,” असे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले असून, ज्या पशुपालकांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी त्वरित पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा किंवा शासनाच्या १९६२ या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा, असेही आवाहन आमदार खताळ यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !