अभ्यासपूर्ण आणि संशोधनधिष्ठीत लेखक गमावला - मंत्री विखे पाटील
◻️ अहिल्यानगर येथील ज्येष्ठ पत्रकार भूषण गोपाळ देशमुख यांचे निधन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, लेखक आणि अहिल्यानगरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे जतन करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व भूषण गोपाळ देशमुख यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या निधनान अभ्यासपूर्ण आणि संशोधनधिष्ठीत लेखक आपण गमावल्याची भावना जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या शोक संदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हणले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्याचा इतिहास, सांस्कृतिक परंपरा तसेच निजामशाही कालखंडाचा सखोल अभ्यास करणारे संशोधक म्हणून त्यांची ओळख सर्वदूर होती. इतिहासावरील त्यांचे लेखन हे नेहमीच अभ्यासपूर्ण, संदर्भसमृद्ध आणि संशोधनाधिष्ठित असे होते.
इतिहासाविषयीची त्यांची तळमळ आणि समाजाला आपल्या वारशाची जाणीव करून देण्याची धडपड यामुळे त्यांनी सुरू केलेला ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम अहिल्यानगरच्या ऐतिहासिक ओळखीला नवी दिशा देणारा आणि नव्या पिढीला इतिहासाशी जोडणारा ठरला.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करताना त्यांनी इतिहास संशोधन, लेखन आणि सांस्कृतिक जतन या क्षेत्रांतही मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू पत्रकार, संवेदनशील लेखक, इतिहासप्रेमी संशोधक आणि समाजाला विचारांची नवी दृष्टी देणारे व्यक्तिमत्त्व जिल्ह्याने गमावले आहे. त्यांची उणीव कायम जाणवत राहील.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.