संगमनेरमध्ये महा राजस्व समाधान शिबिरात लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ

संगमनेर Live
0
संगमनेरमध्ये महा राजस्व समाधान शिबिरात लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ


◻️ जनतेप्रमाणेचं कायद्याच्या न्यायालयात देखील सत्याचाच विजय होईल - आमदार अमोल खताळ

​संगमनेर LIVE | “जोपर्यंत माझ्या पाठीशी सामान्य जनता आहे, तोपर्यंत मला कोणाचीही भीती नाही. जनतेने दिलेल्या विश्‍वासाच्या बळावर या तालुक्यात विकासाची वाटचाल सुरू असून ती यापुढे अधिक वेगाने सुरू राहील,” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

​संगमनेर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज महा महसूल समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध शासकीय विभागांच्या प्रमाणपत्रांचे लाभार्थ्यांना वितरण करताना आमदार खताळ बोलत होते.

संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, महावितरणचे प्रदीप वट्टमवार, कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके व सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

​आपल्या भाषणात आमदार खताळ यांनी प्रशासकीय पारदर्शकतेवर विशेष भर दिला. पूर्वीच्या काळी काही मोजक्या लोकांनी सरकारी कार्यालयांवर मक्तेदारी निर्माण केली होती, मात्र आता अधिकारी मोकळेपणाने काम करत असून सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळत आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचत असल्यामुळे प्रशासनावरील जनतेचा विश्‍वास अधिक दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.

​संगमनेर तालुक्यातील १४ महसूल मंडळांमध्ये विशेष अभियान राबवून प्रशासनाने अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. या अभियानांतर्गत १ हजार ७९७ फेरफार प्रकरणे, ३८० सातबारा उताऱ्यांमधील दुरुस्ती आणि १ हजार ७० एक खिडकी योजनेअंतर्गत आलेले अर्ज त्वरित निकाली काढण्यात आले. याशिवाय सुमारे ४ हजार ५०० डिजिटल सातबारे व १ हजार ७०० महसूल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच विधानसभेत सातत्याने मांडलेल्या तुकडाबंदीच्या प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे राज्यातील ५० लाख कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असल्याचेही आमदार खताळ यांनी सांगितले.

​शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असून तालुक्यात ५९ हजारांहून अधिक शेतकरी ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर शेकडो शेतकऱ्यांना सौर कृषी पंप, ट्रॅक्टर आणि कृषी अवजारांचे वितरण करण्यात आले आहे. तळेगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी भोजापूर धरण, सिंचन योजना आणि कालव्यांच्या दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौठे मलकापूर परिसरात एमआयडीसी उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेरमधूनच व्हावा यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

“माझ्यासारख्या ४२ वर्षांच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जनतेने विधानसभेत पाठवले. ज्यांचा पराभव संगमनेरच्या जनतेने केला, त्यांना पराभव सहन होत नसल्याने ते माझ्यावर खोटे-नाटे आरोप करत आहेत आणि पुन्हा आमदार-मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहेत. न्यायालयाने केवळ याचिका सुनावणीसाठी स्वीकारली आहे. जनतेच्या न्यायालयात माझा विजय झाला असून न्यायप्रविष्ट प्रकरणातही सत्याचाच विजय होईल,” असा घणाघात आमदार खताळ यांनी केला.

​"तळागाळातील नागरिकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी १४ मंडळांमध्ये समाधान शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांच्या माध्यमातून तालुक्यातील १० हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळाला आहे.” असे प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी सांगितले.

“पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महसूल मंडळात हे शिबिर यशस्वीपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आला.” असे तहसीलदार धीरज मांजरे यांनी नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !