अण्णाभाऊ साठे हे एका समाजाचे नव्हे तर कष्टकऱ्यांचे लोकनेते - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
अण्णाभाऊ साठे हे एका समाजाचे नव्हे तर कष्टकऱ्यांचे लोकनेते - आमदार अमोल खताळ

◻️ संगमनेरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

​संगमनेर LIVE | “लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते, तर कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि वंचित-शोषित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महामानव व लोकनेते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान इतिहासात अजरामर असून, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.” असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

​लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ शिवसेना, महायुती आणि लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल खताळ बोलत होते.

​आपल्या भाषणात पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांनी आपल्या लोककलेच्या व शाहिरीच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुध्द आवाज बुलंद केला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मोठा संघर्ष उभारला. जातीभेद, वर्गीय शोषण आणि सामाजिक अन्यायाविरोधात त्यांनी आपल्या लेखणी व शाहिरीचा प्रभावी वापर करत उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आयुष्यभर केले. अण्णाभाऊंचे साहित्य देश-विदेशात गौरवले गेले असून ते केवळ एक साहित्यिक नसून सामान्य माणसाच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांच्या या विचारांनी लाखो वंचितांना आत्मविश्‍वासाने जगण्याची प्रेरणा दिली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

​“संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजघटकांना समान न्याय देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. महापुरुषांच्या जयंत्या उत्साहात साजरा करण्याची नवी परंपरा आपण संगमनेरमध्ये सुरू केली आहे. राज्य सरकारच्या पुढाकारातून मुंबईतील चिरागनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक व प्रशिक्षण संस्थेसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुण उद्योजक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.” असे देखील आमदार अमोल खताळ यांनी नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !