गुरूपौर्णिमा उत्सव काळात साईंच्या झोळीत ७.८१ कोटींचे दान
◻️ ३ लाखांहून अधिक साईभक्तांनी घेतले दर्शन; परकीय चलनासह सोने-चांदीचेही दान
संगमनेर LIVE (शिर्डी) | श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने बुधवार, दि. २८ जुलै २०२६ ते शुक्रवार, दि. ३० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरूपौर्णिमा उत्सवास देशभरातून आलेल्या लाखो साईभक्तांच्या उपस्थितीत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या तीन दिवसीय उत्सवादरम्यान साईसंस्थानस एकूण ०७ कोटी ८१ लाख १३ हजार ३७७ रुपयांची विक्रमी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
उत्सव काळात भाविकांनी वेगवेगळ्या माध्यमांतून भरभरून दान दिले असून, यामध्ये रोख स्वरूपात दक्षिणा पेटीतून रुपये ०२ कोटी ०४ लाख ३५ हजार ५५७, देणगी काऊंटरवर रुपये ०१ कोटी २५ लाख ४७ हजार ९३५, पीआरओ देणगीपोटी रुपये ८७ लाख १४ हजार, तसेच डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी आणि मनी ऑर्डरच्या माध्यमातून एकूण रुपये ०२ कोटी ०७ लाख ८४ हजार ७०१ प्राप्त झाले आहेत. याशिवाय परकीय चलनाद्वारे रुपये ०५ लाख ६५ हजार ९९१, १,१२५.५७० ग्रॅम सोने (मूल्य: रुपये ०१ कोटी ४६ लाख ७४ हजार ५४४) आणि २,३७६.५०० ग्रॅम चांदी (मूल्य: रुपये ०३ लाख ९० हजार ६४९) संस्थानला प्राप्त झाली आहे.
श्री गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त साईदर्शनासाठी देशभरातून ३ लाखांहून अधिक साईभक्तांनी शिर्डीत हजेरी लावली. संस्थानच्यावतीने भाविकांसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे १ लाख ९४ हजार २८५ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला असून ३९,६११ अन्नप्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले. दर्शन रांगेतील १ लाख ६५ हजार २०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले असून, सशुल्क प्रसादरूप लाडू पाकिटांच्या माध्यमातून ७१ लाख ७ हजार ३६० रुपये प्राप्त झाले आहेत.
तसेच उत्सव काळात हजारो भाविकांसाठी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवास, द्वरावती निवास, साई आश्रम भक्तनिवास, साईधर्मशाळा आणि अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात राहण्याची सोय करण्यात आली होती. साईधर्मशाळा येथे विविध भागांतून आलेल्या ३९ पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनीही निवास व्यवस्थेचा लाभ घेतला.
दरम्यान, उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्तांनी विशेष परिश्रम घेतले. शिर्डीत आलेल्या भाविकांच्या सुरक्षेची आणि सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आल्याने साईभक्तांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.