संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा विक्रेत्यांवर मोठी कारवाई
◻️ २.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; ३ आरोपी जेरबंद!
संगमनेर LIVE | अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री आणि तस्करीविरोधात धडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि संगमनेर शहर पोलिसांनी जनतानगर भागात संयुक्त छापा टाकून १ लाख ३ हजार २५० रुपये किमतीचा ४.१३० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून या प्रकरणी तीन आरोपींना रंगेहात अटक केली आहे.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, जनतानगर येथील एक जण आपल्या राहत्या घरात साथीदारांसह गांजाच्या पुड्या तयार करून विक्री करत असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जनतानगर येथील संशयित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी जनतानगर येथील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी संशयितांचे घर आणि घरासमोर उभ्या असलेल्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेड ची झडती घेतली असता घरात आणि गाडीच्या डिक्कीत गांजा आढळून आला. या धाडीत पोलिसांनी १ लाख ३ हजार २५० रुपये किमतीचा ४.१३० ग्रॅम गांजा, ८० हजार रुपयांची टीव्हीएस ज्युपिटर मोपेड, ५० हजार रुपयांचा मोबाईल तसेच प्लास्टिकच्या लहान पिशव्या, चिकट टेप, स्टेप्लर आणि पिना असा एकूण २ लाख ३४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.