भावी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचलो - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
भावी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचलो - आमदार अमोल खताळ 

◻️ निमज येथे ८९ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ! थोरातांचे नाव न घेता केली बोचरी टीका 

​संगमनेर LIVE | “तालुक्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळेच एका भावी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून मी विधानसभेत पोहोचलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील २८८ आमदारांमध्ये मी स्वतःला सर्वात नशीबवान आमदार समजतो. जनतेने दाखवलेल्या या विश्‍वासामुळेच संगमनेरपासून दिल्लीपर्यंत माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.” अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता बोचरी टीका केली.

संगमनेर तालुक्यातील निमज येथे ८९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला, त्याप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ​या कार्यक्रमास महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच निमज व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​आपल्या भाषणात गावाच्या विकासाचा रोडमॅप मांडताना आमदार खताळ यांनी सांगितले की, निमज गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कधीही कमतरता पडू दिली जाणार नाही. विकासकामांत राजकीय अडथळे निर्माण करणाऱ्यांना योग्य वेळी जनताच धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला. 

तसेच आमदार झाल्यापासून कोणत्याही गावाला निधी वाटताना आपण कधीही भेदभाव केला नाही. ज्या गावात मला कमी मतदान मिळाले, त्या गावातील नागरिकही माझेच मतदार आहेत या भावनेने प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे, असे सांगतानाच पूर्वी निधी उपलब्ध असूनही केवळ ग्रामपंचायतीतील राजकारणामुळे तो परत जावा लागला ही अत्यंत दुर्दैवी बाब होती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. देणारा तयार असूनही घेण्याची मानसिकता नसेल तर त्याचा थेट फटका गावाच्या प्रगतीला बसतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

​तालुक्यातील गेल्या काही दशकांच्या राजकारणावर भाष्य करताना आमदार खताळ यांनी पाणी आणि सिंचनाच्या प्रश्नावर विशेष भर दिला. या तालुक्यात गेली चाळीस वर्षे केवळ माणसांची 'जिरवा-जिरवी' करण्याचे राजकारणावर झाले, मात्र आता आपल्याला माणसे जिरवायची नसून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने सिंचन प्रकल्पांना गती देऊन 'पाणी जिरवण्याचे' काम करायचे आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

सिंचन योजनांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, भोजापूर चारीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आले असून परिसरातील ओढे-नाले पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर साकूर भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उपसा सिंचन योजना व विविध बंधाऱ्यांसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, जनसेवा मंडळाच्या माध्यमातून सुरुवातीपासून संघर्ष करणाऱ्या सहकाऱ्यांचे आभार मानत आमदार खताळ यांनी विकासाचा हा ध्यास असाच पुढे चालू राहील, असा विश्‍वास शेवटी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !