मध्यरात्री दूध वाहनातून थेट शेतकऱ्याच्या दारी पोहोचले आमदार अमोल खताळ
◻️ अंधाररात्र अन् खडतर वाटेवरून प्रवास करून डाळींब शेतकऱ्यांला दिला आधार
संगमनेर LIVE | रात्रीची पावणेबाराची वेळ... सर्वत्र पसरलेला किर्र् अंधार, पुढे खडतर रस्ता अन् शेवटच्या टोकाला वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरल्याने चिंतेने व्याकूळ झालेला एक शेतकरी. अशा प्रतिकूल अन् बिकट परिस्थितीत कोणतीही पर्वा न करता, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत आमदार अमोल खताळ मध्यरात्री थेट शेतकऱ्याच्या दारी पोहोचले. अतोनात नुकसान झालेल्या डाळिंब बागेची पाहणी करत त्यांनी बळिराजाच्या डोळ्यांतील अश्रू पुसले अन् शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी सोमनाथ किसन गोडसे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रातील डाळिंब बागेवर रासायनिक औषधाची फवारणी केली होती. मात्र, दुर्दैवाने फवारणीनंतर संपूर्ण बागेचे अतोनात नुकसान झाले. वर्षभराची मेहनत आणि लावलेला पैसा डोळ्यांदेखत मातीत मिळाल्याने गोडसे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले व त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
गोडसे यांच्यावर कोसळलेल्या या संकटाची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी क्षणाचाही विलंब न करता रात्री उशिरा पेमगिरीकडे धाव घेतली. पेमगिरी गावात पोहोचल्यानंतर गोडसे यांचे घर मुख्य गावापासून सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतरावर येळूशी मळ्यात असल्याचे समजले. तेथील रस्ता अत्यंत खडतर आणि दुर्गम असल्याने पुढे जाणे मोठे आव्हान होते. मात्र, शेतकऱ्याचे दुःख जाणून घेण्याची तीव्र तळमळ असल्याने आमदार खताळ यांनी त्या खडतर वाटेची पर्वा केली नाही. त्यांनी मध्यरात्री दूध वाहतूक करणाऱ्या एका वाहनाचा आसरा घेतला आणि थेट गोडसे यांच्या घरापर्यंत प्रवास केला.
आमदार खताळ स्वतः आपल्या भेटीला येत असल्याची माहिती मिळताच गोडसे कुटुंबीय त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. आमदारांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त डाळिंब बागेत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी हवालदिल झालेल्या सोमनाथ गोडसे यांनी संपूर्ण घटनेची आपबीती त्यांच्यासमोर मांडली.
घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार खताळ यांनी मध्यरात्रीच कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधला. “बागेचा तातडीने आणि वस्तुनिष्ठ पंचनामा करा, तसेच शासनाच्या नियमांनुसार बाधित शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही विनाविलंब पूर्ण करा,” असे स्पष्ट व कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
“माझा शेतकरी बांधव आर्थिक आणि मानसिक संकटात असताना मी शांत बसू शकत नाही. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करेन. कोणत्याही परिस्थितीत सोमनाथ गोडसे व त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही; मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
दरम्यान, राजकारणापलीकडे जाऊन, मध्यरात्रीच्या सुमारास खडतर वाट तुडवत शेतकऱ्याच्या दुःखात सहभागी होणाऱ्या आमदार अमोल खताळ यांच्या या संवेदनशील आणि तत्पर कृतीची संगमनेर तालुक्यासह संपूर्ण परिसरात तीव्र कौतुकाने चर्चा होत आहे. लोकप्रतिनिधी असावा तर असा, अशाच भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत.