आमदार अमोल खताळ यांनी मातोश्रींसमवेत घेतला पायी वारीचा आनंद
◻️ वारकऱ्यांसोबत गळ्यात टाळ आणि हातात वीणा घेऊन धरला ठेका!
संगमनेर LIVE | आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अवघी पंढरी विठ्ठलमय झाली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो दिंड्या विठूरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील अतिशय श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र माणकेश्वर आणि श्री क्षेत्र बाळेश्वर पायी दिंडीसोहळ्याचे पंढरपूरकडे अत्यंत उत्साहात आगमन होत आहे. या भक्तिमय वातावरणात आमदार अमोल खताळ यांनी आपल्या मातोश्रींसमवेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवत वारकरी परंपरेचा आणि भक्तीचा अनोखा आनंद लुटला.
पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे दिंडी पोहोचली असता, आमदार अमोल खताळ यांनी गळ्यात टाळ आणि हातात वीणा घेऊन वारकऱ्यांसोबत पावलांचा ठेका धरला. “ज्ञानबा-तुकाराम” आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात त्यांनी काही किलोमीटरचा पायी प्रवास केला. शेकडो किलोमीटरची पायपीट करूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव, समर्पण आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
आमदार खताळ यांच्या मातोश्री गेल्या २७ वर्षांपासून अखंड पायी वारी करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या मातोश्रींसोबत पायी चालण्याचा आणि दिंडीतील ज्येष्ठ वारकरी बांधवांशी आपुलकीने संवाद साधण्याचा योग आल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वारीतील सर्व ज्येष्ठ वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व आशीर्वाद घेतले.
“वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षांपासून भक्ती, सेवा, समता, शिस्त आणि सामाजिक ऐक्याची महान परंपरा जपली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही वारकरी बांधवांच्या सहवासात पायी वारी करण्याचे आणि विठूरायाच्या दर्शनाचे भाग्य मला लाभले, हे माझे मोठे सौभाग्य आहे. वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आणि जनतेचे अथांग प्रेम यामुळेच मला लोकसेवेची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातील ही संतपरंपरा आणि वारकरी चळवळीचा दीप असाच अखंड तेवत राहो, हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना!” अशा भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केल्या.