शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’सारख्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी!

संगमनेर Live
0
शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’सारख्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी!

◻️ ​आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

संगमनेर LIVE (​मुंबई) | विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या ‘स्टिंग’सारख्या उच्च कॅफिनयुक्त  ऊर्जा पेयांच्या विक्रीवर शाळांच्या ५०० मीटर परिसरात बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा आणि भविष्याचा विचार करता, आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत केलेल्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे.

​शाळा परिसरातील टपरी आणि दुकानांमध्ये सहज उपलब्ध होणारी ही पेये आकर्षक पॅकेजिंगमुळे शालेय मुलांमध्ये लोकप्रिय झाली होती. मात्र, त्यातील उच्च कॅफिनचे प्रमाण मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे तांबे यांनी सभागृहात वारंवार निदर्शनास आणून दिले होते. केवळ चर्चा न करता, त्यांनी धोरणात्मक निर्णय आणि स्पष्ट नियमावलीची मागणी लावून धरली होती.

आमदार सत्यजीत तांबे यांनी या मुद्द्यावर १२ जुलै २०२४ पासून अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मंत्र्यांना पत्रे लिहिली आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत सलग बैठका घेऊन एनर्जी ड्रिंक्सवरील धोरण, जनजागृती आणि निर्बंधांबाबत आग्रही भूमिका मांडली होती. 

अखेर १ जुलै २०२५ रोजी पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावर कठोर निर्देश दिले आहेत.

शाळा परिसरात अशा हानिकारक उत्पादनांची विक्री रोखल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला संरक्षण मिळणार आहे. पालकांसह शिक्षण क्षेत्रातूनही या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. दरम्यान, हा निर्णय केवळ शाळा परिसरापुरता मर्यादित न ठेवता, राज्यस्तरावर यापेक्षाही कठोर आणि सर्वसमावेशक धोरण आखण्यात यावे, अशी मागणीही आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

दरम्यान, ​या निर्णयामुळे शालेय मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, आगामी काळात ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !