संगमनेर नगरपरिषद भटक्या श्वानांना लावणार ‘मायक्रोचिप’
◻️ महाराष्ट्रात असा उपक्रम राबवणारी ‘संगमनेर नगरपरिषद’ ठरली पहिली
संगमनेर LIVE | शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी संगमनेर नगरपरिषदेने क्रांतीकारी उपक्रम हाती घेतला आहे. श्वानांचे निर्बीजीकरण (शस्त्रक्रिया) आणि अॅटी-रेबीज लसीकरण केल्यानंतर त्यांना ‘मायक्रोचिप' बसविणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे राज्यातील इतर शहरांचे लक्ष संगमनेर नगरपरिषदेच्या या यशस्वी मॉडेलकडे वेधले गेले आहे.
या मायक्रोचिप तंत्रज्ञानामुळे प्रत्येक भटक्या श्वानाची डिजिटल ओळख निर्माण होणार असून, त्यांचा मागोवा घेणे आणि दैनंदिन काळजी घेणे अत्यंत सुलभ होणार आहे. यामुळे शहरातील श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत होईलच, शिवाय त्यांच्या आरोग्यविषयक नोंदी ठेवणेही सोपे जाईल. तसेच नियमित लसीकरणामुळे शहरात रेबीजचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना मोकळे व सुरक्षित वातावरण मिळण्यास हातभार लागणार आहे.
ही संपूर्ण मोहीम अतिशय नियोजनबध्द पध्दतीने राबवली जात आहे. शहरातील विविध भागांतून श्वानांना पकडून प्रथम नगरपरिषदेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांची सखोल आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीत शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या श्वानांवर निर्बीजीकरण करून त्यांना अॅटी-रेबीज लस दिली जाते. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस या श्वानांची विशेष वैद्यकीय काळजी घेतली जाते आणि ते पूर्णपणे बरे झाल्यानंतरच त्यांच्या शरीरात सुरक्षितपणे मायक्रोचिप बसवली जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित श्वानाला ज्या परिसरातून आणले होते, त्याच ठिकाणी सुरक्षितपणे परत सोडले जाणार आहे.
विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान प्राण्यांच्या आरोग्याची पूर्ण दक्षता घेतली जात आहे. गर्भवती, नुकतीच पिल्लांना जन्म दिलेले किंवा आजारी आणि अशक्त असलेल्या श्वानांवर कोणतीही शस्त्रक्रिया न करता त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ परिसरात सुरक्षितपणे सोडले जाईल.
संगमनेर नगरपरिषदेच्या या अभिनव उपक्रमामुळे प्राण्यांप्रती संवेदनशील दृष्टिकोन जपला जात आहेच, शिवाय नागरिकांचा भटक्या श्वानांचा त्रासही कमी होत आहे. प्राण्यांचे कल्याण आणि मानवी सुरक्षा यांचा सुंदर मेळ या योजनेतून साधला जात आहे.
दरम्यान, या उपक्रमाची दखल आता राज्यातील इतर अनेक नगरपालिका आणि महानगरपालिकांकडूनही घेतली जात आहे.