माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या ‘त्या..’ वक्तव्यावरून राजकीय वादंग

संगमनेर Live
0
माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या ‘त्या..’ वक्तव्यावरून राजकीय वादंग

◻️ विधानसभेचा अवमान? संगमनेर ​शिवसेनेकडून निषेध 

​संगमनेर LIVE | महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संगमनेर नगरपरिषदेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात उपस्थित केला होता. यानंतर माजी नगराध्यक्ष अंजली (दुर्गाताई) सुधीर तांबे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना विधानसभेचा ‘अपवित्र’ असा उल्लेख केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेने यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

अंजली (दुर्गाताई) तांबे या राजकीय कुटुंबातून येतात. विधान परिषदचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या त्या पत्नी, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजीत तांबे यांच्या मातोश्री, तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या त्या भगिनी आहेत. ज्यांनी अनेक दशके विधानमंडळात प्रतिनिधित्व केले आहे. स्वतः त्यांनी १५ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. अशा जबाबदार पदावर काम केलेल्या व्यक्तीने राज्याच्या सर्वोच्च लोकशाही संस्थेबद्दल वापरलेली भाषा दुर्दैवी असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

सरकारवर टीका करण्याचा किंवा मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु विधानसभेलाच ‘अपवित्र’ म्हणणे हा केवळ सभागृहाचा नव्हे, तर जनतेने दिलेल्या जनादेशाचाही अपमान आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. आमदार खताळ यांनी उपस्थित केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर वस्तुनिष्ठ उत्तर देण्याऐवजी अशा प्रकारची टिप्पणी करणे लोकशाही मूल्यांना धरून नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

​दरम्यान, या प्रकरणावर संबंधितांनी त्वरित स्पष्टीकरण द्यावे आणि लोकशाहीतील घटनात्मक संस्थांचा सन्मान राखावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !