पुणे - नाशिक रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर समितीची स्थापना

संगमनेर Live
0
पुणे - नाशिक रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर समितीची स्थापना

◻️ आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश!

संगमनेर LIVE | पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गाबाबत (अलाईनमेंट) सखोल तांत्रिक अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीच्या स्थापनेमुळे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला नव्याने गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करणारे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, सुरुवातीच्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार प्रस्तावित मार्ग खोडद (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) परिसराच्या जवळून जात होता. त्यामुळे रेडिओ खगोलशास्त्रीय संशोधनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर-शिर्डीमार्गे सुधारित मार्ग निश्चित केला. मात्र मूळ मार्ग अधिक सरळ, कमी अंतराचा आणि वेळ वाचवणारा असल्याने त्याचा पुनर्विचार करण्याची मागणी विविध स्तरांतून होत होती.

या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, समितीमध्ये रेल्वे बोर्डाचे सदस्य (इन्फ्रास्ट्रक्चर) विवेक गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त आणि नाशिक विभागीय आयुक्त यांचा समावेश आहे. समिती मूळ व सुधारित दोन्ही मार्गांचा अभ्यास करून जीएमआरटी वर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे परीक्षण करणार आहे. तसेच बोगदे, उड्डाणपूल किंवा मर्यादित मार्गबदल यांसारख्या पर्यायांची तांत्रिक व्यवहार्यता तपासून राज्य शासनाला ६० दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

या निर्णयामुळे संगमनेरसह उत्तर महाराष्ट्रातील उद्योग, शेती, व्यापार, पर्यटन आणि प्रवासी वाहतुकीला दीर्घकालीन लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आमदार अमोल खताळ म्हणाले, “पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा कणा ठरणारा प्रकल्प आहे. हा मार्ग शक्य तितका सरळ, जलद आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असावा, यासाठी मी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. वैज्ञानिक संशोधनाची पवित्रता अबाधित ठेवत विकासाचाही मार्ग खुला राहावा, ही आमची भूमिका आहे. राज्य शासनाने डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सकारात्मक पाऊल उचलले आहे. समितीच्या शिफारशींमुळे प्रकल्पाला योग्य दिशा मिळेल आणि संगमनेरसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल, असा मला विश्‍वास आहे.”

दरम्यान, आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य शासनाचे आभार मानत, या प्रकल्पाच्या मूळ उद्दिष्टांना न्याय देणारा आणि जनहिताचा निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !