बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी ताकद - आमदार अमोल खताळ
◻️ निवासस्थानी रक्षाबंधन उत्साह; लाडक्या बहिणींनी बांधली राखी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. मतदारसंघातील शेकडो ‘लाडक्या बहिणींनी' आमदार खताळ यांचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर प्रेम आणि विश्वासाची राखी बांधली.
रक्षाबंधनानिमित्त आमदार खताळ यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच महिला भगिनींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बहिणींनी आमदारांचे औक्षण केले व राखी बांधून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित बहिणींनी, 'आमदार खताळ यांच्या कार्याला आमचा सदैव पाठिंबा आणि आशीर्वाद राहील,' अशी ठाम भावना व्यक्त केल्याने भाऊ-बहिणीच्या नात्यातील एक अत्यंत भावनिक प्रसंग उपस्थितांना अनुभवायला मिळाला.
बहिणींनी व्यक्त केलेल्या या अलोट प्रेमाचा आणि विश्वासाचा स्वीकार करताना आमदार अमोल खताळ यांनी सर्वांचे आभार मानले. कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले की, "माझ्या बहिणींचे प्रेम, त्यांचा विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि मतदारसंघातील माझ्या प्रत्येक बहिणीच्या सुख-दुःखात हक्काचा भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.” अशी ग्वाही दिली.
दरम्यान, रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून तो परस्पर विश्वास आणि स्नेह अधिक दृढ करणारा धागा आहे, याची प्रचिती या सोहळ्यातून आली. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असलेल्या या सोहळ्यात, लाडक्या बहिणींनी प्रेमाने बांधलेली राखी आणि दिलेला आशीर्वाद यामुळे यंदाचे रक्षाबंधन आमदार अमोल खताळ यांच्यासाठी विशेष संस्मरणीय ठरले.