साकूरच्या बिरोबा देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देणार - आमदार अमोल खताळ
◻️ यात्रेनिमित्त बिरोबारायाचे घेतले दर्शन; बळीराजाच्या सुख-समृध्दी साठी घातले साकडे
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | साकूर येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बिरोबा महाराज देवस्थानाचा विकास अधिक गतीने व्हावा, यासाठी सध्या ‘क' वर्गात असलेल्या या देवस्थानाला भविष्यात शासनाकडून ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर साकूर (ता. संगमनेर) येथे दरवर्षीप्रमाणे बिरोबा महाराजांचा यात्रोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या यात्रोत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी मंदिरात जाऊन बिरोबारायाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी साकूर पठारभागातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 'बिरोबाच्या नावानं चांगभलं' असा जयघोष करत, डफांच्या निनादात आणि वाजत-गाजत आमदार खताळ यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले, “साकूरचे बिरोबा महाराज हे असंख्य भक्तांचे जागृत देवस्थान आहे. या भागात आल्यावर नेहमी बिरोबाच्या चरणी नतमस्तक होऊनच मी माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात करतो. यंदा तालुक्यात चांगला पाऊस पडावा, परिसरासह संपूर्ण तालुक्यातील आपला बळीराजा सुखी व्हावा आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृध्दी यावी, हेच साकडे मी आज बिरोबा महाराजांच्या चरणी घातले आहे.” आमदार झाल्यापासून मतदारसंघातील प्रत्येक देवस्थान आणि मंदिराच्या विकासासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
देवस्थानाच्या विकासाबाबत भूमिका स्पष्ट करताना आमदार खताळ म्हणाले की, बिरोबा देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाल्यास देवस्थानच्या विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध होईल आणि कामांना मोठी गती मिळेल. त्यामुळे शासन स्तरावर आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून हा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.
दरम्यान, याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब खेमनर, रऊफ शेख, गुलाब भोसले, ॲड. अमित धुळगंड, सरपंच रविंद्र दातीर, सुभाष पेंडभाजे, भिमराज जाधव, मच्छिंद्र खेमनर, किशोर खेमनर, संकेत खेमनर, राजेंद्र गोसावी, बाळू खेमनर, सचिन खेमनर, तुषार पेंडभाजे, संतोष खेमनर, भाऊ डोंगरे, प्रमोद साळुंके, अझहर पटेल, गणेश गाडेकर, संतोष बिडकर, गोरख बागुल, अनिल आमले, सुरेश काळे, गणेश डोंगरे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.