स्थानिक गुन्हे शाखेचा जिल्ह्यातील गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’

संगमनेर Live
0
स्थानिक गुन्हे शाखेचा जिल्ह्यातील गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’

◻️ तीन महिन्यांत ४४१ कारवाया, ७८६ आरोपी जेरबंद; पाऊणे आठ कोटींचा मुद्देमाल जप्त!

संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेश व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गेल्या तीन महिन्यांत विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे.

१ मे २०२६ ते ३१ जुलै २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकले आणि ४४१ यशस्वी कारवाया करत तब्बल ७८६ आरोपींना जेरबंद केले. या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधून तब्बल ७ कोटी ८४ लाख १२ हजार ७१५ रुपयांचा ऐवज व मुद्देमाल जप्त केला असून, पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

​स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ किरकोळ गुन्ह्यांवरच नाही, तर अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले. यामध्ये खून, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी व चोरी यांसारख्या गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याशिवाय अवैध वाळू उपसा, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म ऍक्ट, एनडीपीएस अंतर्गत मादक पदार्थ विरोधी मोहीम, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, गोमांस वाहतूक, अवैध दारूबंदी कायदा आणि जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात आली. अनैतिक व्यापारावर अंकुश ठेवण्यासाठी 'पिटा' कायद्यान्वये विविध ठिकाणी छापे मारून कठोर कारवाई केली आहे.

​केवळ गुन्हे उघडकीस न आणता सराईत व अभिलेखावरील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी प्रशासनाने कठोर रणनीती आखली आहे. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अनेक सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून, सराईत गुन्हेगार टोळ्यांवर ‘मकोका’ आणि ‘एमपीडीए’ यांसारख्या अत्यंत कठोर कायद्यांन्वये कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, ​जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ही धडक मोहीम इथून पुढेही अशीच सातत्याने सुरू राहील, तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !