संगमनेरमध्ये महिलेला लुटणारे राहत्याचे दोन जण कारसह एसीबीच्या जाळ्यात!
◻️ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मारला होता सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
संगमनेर LIVE | रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेला पत्ता विचारण्याचा बहाणा करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व मंगळसूत्र जबरीने हिसकावून पसार झालेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने गुरुवारी तातडीने बेड्या ठोकल्या. या धडक कारवाईत गुन्ह्यात वापरलेली ६ लाख रुपये किमतीची बलेनो कार जप्त करण्यात आली असून, दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी संगमनेर तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
काकडवाडी (ता. संगमनेर) येथील रहिवासी तुळसाबाई संपत शिरसाठ या २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबल्या होत्या. याच वेळी कारमधून आलेल्या अज्ञात भामट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाठले आणि काही कळण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व मंगळसूत्र जबरीने ओरबाडून पोबारा केला. या दुर्दैवी घटनेप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(६) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन ते तातडीने उघडकीस आणण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या निर्देशांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल डोके, फुरकान शेख, योगेश कर्डीले, आजिनाथ पाखरे, प्रशांत राठोड व जालींदर साखरे यांचे विशेष तपास पथक तयार करून त्यांना मार्गदर्शनाखाली रवाना केले.
हे तपास पथक गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढत असताना गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी महत्त्वाची माहिती हाती आली. सदर गुन्हा राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील दोघांनी केल्याची पक्की बातमी मिळताच, पथकाने तत्काळ कोऱ्हाळे येथे छापा टाकून या दोघांना राहत्या घरातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी संगमनेर येथील जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यासाठी बलेनो कारचा वापर केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीची ही कार जप्त केली.