प्रवरेच्या संस्कारातून विद्यार्थ्यांनी जीवनातील शिखरे जिंकावीत - विश्‍वास पाटील

संगमनेर Live
0
प्रवरेच्या संस्कारातून विद्यार्थ्यांनी जीवनातील शिखरे जिंकावीत  - विश्‍वास पाटील

◻️ गुणवंत व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा प्रवरा परिवाराच्या वतीने गौरव


संगमनेर LIVE (लोणी) | छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाला संस्कार देणारी आणि सहकार व शिक्षणाची पंढरी म्हणून देशभर ओळख निर्माण केलेली अहिल्यानगरची भूमी आहे. शिक्षणातून संवेदना, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा प्रवरा परिसर विद्यार्थ्यांना जीवन घडविण्याचे संस्कार देणारा आहे. जीवनाच्या वाटचालीत अनेक चढ-उतार येतील; मात्र प्रत्येक आव्हानावर मात करत जीवनातील प्रत्येक शिखर जिंकण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास पाटील यांनी केले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक समूहाच्या वतीने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील गुणवंत तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विश्‍वास पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. व्ही. एन. मगरे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. संध्या गायकवाड, कैलास तांबे, सोपान शिरसाठ, भारत घोगरे, डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. प्रदीप दिघे, सौ. लीलावती सरोदे, डॉ. महेश खर्डे यांच्यासह प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विश्‍वास पाटील म्हणाले, “आज या भूमीत आल्यानंतर खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो. माझ्या ‘झाडाझडती’ या कादंबरीला पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार माझ्या जीवनाला नवा आकार देणारा आणि परिवर्तनाची दिशा देणारा ठरला.” त्या काळातील आठवणी सांगताना त्यांनी प्रवरा आणि विखे पाटील परिवाराने शिक्षण व साहित्य क्षेत्रासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला.प्रवरेचे नाव शिक्षण क्षेत्रात देशभर अभिमानाने घेतले जाते. येथील शिक्षणपद्धती, वातावरण आणि संस्कार विद्यार्थ्यांना घडविणारे आहेत. जीवनात अनेक चढ-उतार येतात; मात्र त्यावर मात करून पुढे जाण्याची शिकवण विद्यार्थ्यांना प्रवरेतून मिळते. “जीवनात अनेक शिखरे पार करायची आहेत. प्रत्येक शिखर चढताना ते जिंकण्याची जिद्द ठेवा. रात्रीचा दिवस करून प्रयत्न करा आणि यश संपादन करा,” असे आवाहन त्यांनी केले.

मराठी भाषेचा गौरव करताना पाटील म्हणाले की, माय मराठी जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी भाषा अत्यंत समृध्द असून तिच्या संवर्धनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. प्रवरा परिवाराचे कार्य नेहमीच इतरांसाठी प्रेरणादायी राहिले असून शिक्षण क्षेत्रात डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी केलेले बदल विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करणारे आहेत.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले, “साहित्य क्षेत्रातील विश्‍वास पाटील यांचे योगदान अनमोल आहे. त्यांच्या साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या आदर्शावर प्रवरा उभी राहिली असून त्यामुळेच प्रवरा आज विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे.”

विद्यार्थ्यांनी प्रवरेचा अभिमान बाळगावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांनीही आपले ध्येय निश्चित करावे आणि प्रवरा परिवाराचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील विविध शाळा व महाविद्यालयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवरा परिवाराच्या वतीने गौरव करण्यात आला. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सौ. संध्या गायकवाड यांचाही यावेळी प्रवरा परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. ते म्हणाले, “नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी देणारे विद्यार्थी घडविण्यासाठी प्रवरा कार्यरत आहे. एआय तंत्रज्ञानासह बदलत्या शिक्षणपद्धतीचा स्वीकार करून कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च स्तरावर पोहोचत आहेत. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे हे स्वप्न आज पूर्णत्वाकडे जात आहे.”

दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल घुले, साक्षी दिघे व डॉ. शांताराम चौधरी यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डाॅ. भाऊसाहेब रणपिसे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !