समनापूरमध्ये दीड वर्षात दीड कोटींची विकासकामे- आमदार अमोल खताळ
◻️ संत बाळूमामा मंदिर कमानीचे आमदार खताळ यांच्या हस्ते लोकार्पण
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “बाळूमामा यांच्या नावाने कमान उभी करण्याची भक्तमंडळाची आणि ग्रामस्थांची मोठी इच्छा होती. कोणत्याही सरकारी निधीची प्रतीक्षा न करता मी स्वखर्चातून या कमानीचे काम पूर्ण केले; कारण माझ्या हातून ही कमान पूर्ण व्हावी, अशी साक्षात बाळूमामांचीच इच्छा होती," अशा भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केल्या.
संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे संत बाळूमामा मंदिर कमानीचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात भाविक आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी आपल्या आमदारकीच्या दीड वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना आमदार खताळ म्हणाले की, “गेल्या दीड वर्षात समनापूर गावाच्या विकासासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आगामी काळातही गावात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्याचा आपला मानस आहे.” शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विरोधकांवर थेट निशाणा साधण्याऐवजी विकासावर बोलणे पसंत करत आमदार खताळ म्हणाले, “गेल्या चाळीस वर्षांत कोणी काय दिले आणि काय दिले नाही, याची राजकीय चर्चा मला करायची नाही. तालुक्यात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावण्यावर माझा भर आहे.” असे त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध कामे वेगाने सुरू आहेत. तसेच, आता खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना-महायुतीमध्ये आल्याने विकासकामांसाठी निधी मिळण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता निधीची अजिबात चिंता करू नये, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर लक्ष केंद्रित
संगमनेर तालुक्यात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, तो सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. तालुक्यातील तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, यासाठी 'कौठे मलकापूर' येथे एमआयडीसी उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था लक्षात घेता, आगामी काळात या शाळांच्या दुरुस्तीची विशेष मोहीम हाती घेतली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.
“महायुती सरकार हे सर्वांचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपले सरकार आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत.” असे आमदार आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या लोकार्पण सोहळ्यास म्हतु शेरमाळे, भाऊसाहेब शेरमाळे, रणजीत जाधव, संजय चांडे, मधुदादा शेरमाळे, भागवत हळनर , संपत गेठे, भाऊ शेरमाळे, पांडुरंग शेरमाळे, रामनाथ केसकर, हौशीराम शेरमाळे, काकासाहेब गुंजाळ, अण्णा शेरमाळे, रावसाहेब शेरमाळे, संदीप शेरमाळे, बाबू शिरमाळे, सुनील चांडे, एकनाथ शेरमाळे, मच्छिंद्र शेरमाळे, अबू इनामदार, ज्ञानदेव शेरमाळे, राजू शेरमाळे, बापू दळवी, देवा शेरमाळे, राजू गायकवाड, भागवत शेरमाळे, मनोज भास्कर, राहुल भास्कर, सोमनाथ शेरमाळे, लहानु शेरमाळे, रणजीत कोल्हे यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवर, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.