उंबरी बाळापूरमध्ये भरदिवसा चोरी
◻️ ज्येष्ठ महिलेच्या घरातून रोख रकमेसह दागिने लंपास
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | घरी कोणीही नसल्याची संधी साधून शनिवारी भरदिवसा एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची खळबळजनक घटना उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) शिवारात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शीला भाऊसाहेब वर्पे (वय ६०) या उंबरी बाळापूर येथे राहतात. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास असल्याने त्या घरी एकट्याच असतात. शनिवारी (दि. २९) सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास त्या काही वैयक्तिक कामानिमित्त घराला कुलूप लावून संगमनेरला नातेवाईकांकडे गेल्या होत्या. घर बंद असल्याची नेमकी हीच संधी हेरून अज्ञात चोरट्यांनी घरावर डल्ला मारला.
दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी राहणारे सुभाष भुसाळ यांनी शीला वर्पे यांना फोन करून संपर्क साधला. “तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून, आतमध्ये कोणीतरी सामानाची उचकापाचक केल्याचे दिसत आहे,” अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
ही माहिती मिळताच वर्पे यांनी तातडीने आपले घर गाठले. घरी पोहोचल्यावर त्यांना घराच्या दोन्ही दरवाजांचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. आत जाऊन पाहिले असता, चोरट्यांनी घरातील दोन कपाटांमधील कपडे आणि इतर सामान खाली अस्ताव्यस्त फेकून संपूर्ण घराची उचकापाचक केली होती. या चोरीत घरातील २ हजार रुपयांची रोख रक्कम आणि पायातील चांदीचे पैंजण अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने आश्वी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरातील वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये, विशेषतः एकट्या राहणाऱ्या वृध्दामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.