बिबट्याला घाबरून पळताना शेततळ्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू
◻️ जवळे कडलग येथील धक्कादायक घटना; तालुक्यात शोककळा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्या दिसल्याच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी पळत असताना तोल जाऊन शेततळ्यात पडून १२ वर्षीय कृष्णा वसंत पवार या चिमुकल्याचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली असून, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे.
कृष्णा शेततळ्यात पडल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. आपत्कालीन बचाव पथकाचे जवान नवनाथ सिनारे आणि प्रशांत पांडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर चिमुकल्या कृष्णाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) मृतदेह संगमनेरच्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जवळे कडलग गावाला बिबट्याच्या दहशतीचा हा पहिला धक्का नाही. यापूर्वीही याच गावात बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात सिध्देश कडलग या चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागले होते. एका बालकाचा बळी गेल्यानंतरही पुन्हा तशीच घटना घडणे, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे. बिबट्याच्या या वाढत्या आणि निर्ढावलेल्या वावरामुळे शेतकरी, महिला व लहान मुलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. “प्रशासन व वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे, तेथे तातडीने पिंजरे लावावेत आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, शासनाने कृष्णाच्या कुटुंबीयांना तातडीने नियमानुसार नुकसानभरपाई आणि आर्थिक मदत द्यावी, असे म्हटले आहे.
दरम्यान, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत कृष्णाला श्रध्दांजली अर्पण केली आहे.