जवळे कडलग येथील पवार कुटुंबियांचे आमदार अमोल खताळांकडून सांत्वन
◻️ वनविभागाला पिंजरे लावण्याचे निर्देश, कुटुंबाला मदतीची ग्वाही
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे एका १२ वर्षीय शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. २९) घडली. कृष्णा वसंत पवार असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. परिसरातील बिबट्याच्या वावरामुळे घाबरून पळताना पाय घसरल्याने कृष्णा शेततळ्यात पडला, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या एकाुलत्या एका निष्पाप जीवाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दुःखात बुडालेल्या पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “एका निष्पाप बालकाचा असा मृत्यू होणे अत्यंत मन हेलावून टाकणारे आहे. या दुःखाच्या डोंगराखाली आपण पवार कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत,” असा धीर देतानाच, शासनाच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.
कृष्णा हा बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे असल्याने, मानवी वस्त्यांमध्ये वाढलेल्या बिबट्यांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. घटनेची संपूर्ण वस्तुस्थिती समोर येण्यासाठी सखोल तपास करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.
मानवी वस्त्यांच्या परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. यावर आमदार खताळ यांनी वनविभागाला स्पष्ट निर्देश दिले. “वनविभागाने आता केवळ पाहणीचा फार्स न करता, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने ठोस पावले उचलावीत. ज्या ठिकाणी बिबट्यांचा वारंवार वावर आढळतो, तिथे तातडीने पिंजरे लावून त्यांना जेरबंद करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात,” असे आदेश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत.
दरम्यान, यावेळी घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी नम्रता हिरे, पोलीस उपनिरीक्षक विकास काळे यांच्यासह रविंद्र देशमुख, रोहिदास साबळे, सुनील देशमुख, कैलास अडभाई, श्रीकांत कडलग, सुदर्शन देशमुख, विक्रांत वैभव नाईकवाडी, अरुण देशमुख, विनोद सुर्वे, संजय देशमुख, सुरेश कडलग, सुशांत कडलग, सुभाष कडलग, महेश सुर्वे, संभाजी कडलग आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.