विखे पाटील फाउंडेशन व रोटरी क्लबकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

संगमनेर Live
0
विखे पाटील फाउंडेशन व रोटरी क्लबकडून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती

 ◻️‘गुड टच-बॅड टच' आणि स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन


संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने, वडगाव गुप्ता येथील ज्ञानसरिता विद्यालयात नुकतेच एका भव्य शालेय आरोग्य तपासणी व किशोरवयीन आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

​हा उपक्रम डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग (समुदाय आरोग्य परिचर्या विभाग), डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

​या शिबिरात विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळलेल्या सामान्य आरोग्य समस्यांवर तसेच किशोरवयीन वयातील बदलांबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विषय सहज समजावा यासाठी केवळ व्याख्याने न देता, पोस्टर प्रदर्शन, प्रात्यक्षिके आणि लक्षवेधी पथनाट्ये (स्किट) सादर करण्यात आली.

​वाढत्या वयातील मुला-मुलींसाठी अत्यंत महत्त्वाच्या पण संवेदनशील मानल्या जाणाऱ्या विषयांवर यावेळी मनमोकळी चर्चा करण्यात आली. यामध्ये मासिक पाळीचे आरोग्य व व्यवस्थापन, 'गुड टच-बॅड टच', स्व-स्तन तपासणी, तोंडाचा व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंध, योग्य पोषण, वैयक्तिक स्वच्छता आणि निरोगी जीवनशैली यांसारख्या विषयांची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटाला अनुरूप अशा प्रभावी पध्दतीने देण्यात आली. कोणत्याही आरोग्य समस्या उद्भवल्यास वेळ न दवडता त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

​या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष अमर गुरव आणि सीएसआर सुनील कटारिया यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. यावेळी ज्ञानसरिता विद्यालयाचे प्राचार्य सुंबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

​हा उपक्रम डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक प्रा. डॉ. अभिजित दिवटे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी रेसिडेंट स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अपूर्वा देशमुख आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. ऐश्‍वर्या तळवलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

दरम्यान, ​नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या प्रा. डॉ. प्रतिभा चांदेकर आणि उपप्राचार्या तसेच विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता औताडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल अनप, दिनेश मगर, प्रिती कडू आणि स्नेहल घोडेकर यांनी प्रयत्न केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !