पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग सुकर; केंद्रीय रेल्वेमंत्र्याशी सकारात्मक चर्चा संपन्न!
◻️ खासदार वाकचौरे आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत दिल्लीत घडामोडीना वेग
संगमनेर LIVE | पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या बहुप्रतीक्षित प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रस्तावित संरेखनामुळे जुन्नर तालुक्यातील खोडद येथील प्रसिध्द ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप' (जीएमआरटी) प्रकल्पासंदर्भात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला विलंब होत आहे, याकडे लोकप्रतिनिधींनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. ही समिती रेल्वे मार्गाच्या संरेखनाचा आणि जीएमआरटी प्रकल्पावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे. डॉ. अनिल काकोडकर समितीचा अहवाल प्राप्त होताच, रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक आणि आवश्यक ती पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या सेमी हायस्पीड रेल्वेमुळे नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यांमधील उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळण्यासोबतच वाहतूक व्यवस्था अधिक जलद होणार आहे. परिणामी, संगमनेर व लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन संपूर्ण परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी गती प्राप्त होणार आहे.
“पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा केवळ एक वाहतूक प्रकल्प नसून तो उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा कणा आहे. डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीमुळे तांत्रिक मुद्द्यांवर नक्कीच योग्य तोडगा निघेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल आणि नाशिक, अहिल्यानगर, पुणे तसेच संगमनेर परिसरातील नागरिकांचे स्वप्न साकार होईल.” अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.