संगमनेर तालुक्यासाठी ३५७ मेट्रिक टन युरियाचा बफर साठा खुला!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या सूचनांनंतर कृषी विभागाची कारवाई
संगमनेर LIVE | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासू नये आणि वेळेत युरिया उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संगमनेर तालुक्यातील शिल्लक असलेला ३५७ मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक (संरक्षित साठा) तातडीने विक्रीसाठी खुला करण्याचे आदेश आमदार अमोल खताळ यांनी दिल्यानंतर कृषी विभागाने नियोजन पूर्ण करत हा साठा विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२०२७ साठी एकूण ७०० मेट्रिक टन युरिया मंजूर करण्यात आला होता. यापैकी पहिल्या टप्प्यात ३४९ मेट्रिक टन युरिया तत्काळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, पावसाचा जोर आणि पेरण्यांचा वाढता वेग लक्षात घेता शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. ही वाढती गरज ओळखून आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून उर्वरित संरक्षित साठा त्वरित खुला करण्याच्या सूचना दिल्या.
आमदारांच्या सूचनेनंतर कृषी विभागाने नियोजनबध्द रीतीने उर्वरित सुमारे ३५७ मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक बाजारात आणल्याने आता तालुक्यात युरियाचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही. कृषी विभागाने केलेल्या या नियोजनामुळे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खत उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच युरियाची खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, खतांचा तुटवडा किंवा बाजारातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जर एखादा कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम वसूल करत असेल किंवा खताची कृत्रिम टंचाई निर्माण करत असेल, तर अशा केंद्रांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार खताळ यांनी कृषी विभागाला दिले आहेत.
“खरीप हंगामात शेतकऱ्याला वेळेवर खत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ नये यासाठी बफर स्टॉक खुला करण्याचे निर्देश दिले होते. आता पुरेसा साठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कडक कारवाई केली जाईल.” असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.