पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यातून भुईकोट किल्ल्याच्या विकासाला गती!
◻️ पर्यटन विकासासाठी राज्य शासन आणि लष्करामध्ये सामंजस्य करार
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष असलेल्या आणि अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भुईकोट किल्ला विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभाग यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि स्टेशन कमांडर पी. सुनील कुमार यांच्या उपस्थितीत लष्कराच्या मुख्यालयात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा किल्ला लष्कराच्या अखत्यारीत असल्याने विकासकामांसाठी त्यांच्या अंतिम परवानगीची आवश्यकता होती. या करारामुळे आता प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या किल्ल्याच्या विकासाची घोषणा केली होती. यानंतर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांतून केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेअंतर्गत या प्रकल्पाला १७ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय व वित्तीय मंजुरी मिळाली होती. आता कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्याने अंमलबजावणीतील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे.
किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप आणि वास्तूचे महत्त्व जपतानाच पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यावर या प्रकल्पात भर देण्यात आला आहे. यामध्ये बुरुज क्रमांक १ ते ११ पर्यंत सुमारे १३७० मीटर लांबीचा आकर्षक 'नेचर वॉकवे' तयार करण्यात येणार असून, तो पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरेल. तसेच, किल्ल्याचा इतिहास आणि महत्त्व उलगडणारे अद्ययावत ’इंटरप्रिटेशन सेंटर', भव्य प्रवेशद्वार, प्रशस्त वाहनतळ (पार्किंग) आणि अद्ययावत स्वच्छतागृहे यांसारख्या पर्यटन सुविधा निर्माण केल्या जातील. याशिवाय, किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक ‘मुक्त नाट्यगृह’ उभारले जाणार असून, परिसरातील प्रकाशव्यवस्था सुधारण्यासाठी संपूर्ण परिसरात 'सोलर स्ट्रीट लाईटिंग' करण्यात येणार आहे.
या सामंजस्य करारानंतर आता भारतीय पुरातत्त्व विभाग, वन विभाग, पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उर्वरित तांत्रिक परवानग्या पूर्ण करून प्रत्यक्ष विकासकामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भुईकोट किल्ला हे अहिल्यानगरच्या पर्यटन विकासाचे एक प्रमुख केंद्र बनेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता आणि त्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. जिल्ह्याला लाभलेल्या ऐतिहासिक, नैसर्गिक आणि अध्यात्मिक वारसा स्थळांचा विकास करून, त्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्याला आमचे प्राधान्य आहे.” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.