भोजापूरचा नदीजोड प्रकल्पात समावेश करून सरकारकडून शब्दपर्ती - आमदार अमोल खताळ
◻️ २७ गावे, ३५ तलाव आणि ६०६ हेक्टर क्षेत्राचा पाणीप्रश्न सुटणार!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाला संजीवनी देणाऱ्या भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा आता ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पात समावेश करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार स्वागत केले असून, “महायुती सरकारने दुष्काळी भागातील जनतेला दिलेला शब्द पाळला आहे,” अशी समाधानकारक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
भोजापूर चारीद्वारे अवर्षणग्रस्त भागातील जलसाठे भरून देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे परिसरातील तब्बल ३५ पाझर तलाव भरले जाणार आहेत. यामुळे लाभक्षेत्रातील ६०६.६३ हेक्टर शेतीला थेट फायदा होणार आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २७ गावांचा पाण्याचा गंभीर प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याने, परिसरातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, “भोजापूर मध्यम प्रकल्प हा संगमनेर आणि सिन्नरसाठी वरदान आहे. मात्र, गेल्या चाळीस वर्षांत चारीच्या प्रश्नावर केवळ राजकारण झाले. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासने देऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची घोर दिशाभूल केली. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने या कामाला गती मिळाली.” असे स्पष्ट केले.
जलसंपदा विभागाची जबाबदारी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आल्यावर त्यांनी भोजापूर चारीच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला. तसेच, या प्रकल्पाचा नदीजोड प्रकल्पात समावेश करण्याची दिलेली ग्वाही त्यांनी पूर्ण केली आहे.
दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन करून संगमनेरच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.