विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी उद्या बुधवारी नाशिक दौऱ्यावर
◻️ संगठन सृजन अभियान शिबिराच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या बुधवार दिनांक २ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक येथील एमटीडीसी रिसॉर्टमध्ये संगठन सृजन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा काॅग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण शिबीर २४ ऑगस्ट पासून सुरु आहे. बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या शिबिराचा समारोप होणार आहे.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, रेहाना चिश्ती, डॉ. विश्वजित कदम, अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया, मोहन जोशी यांच्यासह वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांचे सकाळी ११ वाजता नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते शिबिराला उपस्थित राहून जिल्हा अध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. तसेच जागतिक राजकारण व भारत या विषयावर राहुल गांधी भाषण करतील, यावेळी ते आदिवासी शिष्टमंडळाशी तसेच राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील व संध्याकाळी दिल्लीला प्रयाण करतील.