‘धर्मवीर गडा’वरील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी ५ कोटींचा निधी मंजूर!

संगमनेर Live
0
‘धर्मवीर गडा’वरील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी ५ कोटींचा निधी मंजूर!

​◻️ पालकमंत्री डॉ. विखे पाटील व आमदार पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश


संगमनेर LIVE (​श्रीगोंदा) | श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक ‘धर्मवीर गडा'चे संवर्धन आणि तेथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत ‘पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालया'ने या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याने गड संवर्धनाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे.

​धर्मवीर गडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे योग्य जतन व्हावे आणि शंभूराजांच्या स्मृतींना साजेसे स्मारक येथे उभे राहावे, यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना आता मोठे यश आले आहे.

​पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, जिल्हा नियोजन समितीअंतर्गत प्राचीन स्मारकांच्या जतन व दुरुस्तीसाठी उपलब्ध असलेल्या निधीतून या कामाचा समावेश करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.

धर्मवीर गड हा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानाच्या इतिहासाशी अतूट नाते सांगणारा वारसा आहे. संगमेश्‍वर येथे कपटाने पकडल्यानंतर शंभूराजांना सुरुवातीला पेडगावच्या याच गडावर आणण्यात आले होते. त्यामुळे या भूमीशी संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि शंभूभक्तांच्या भावना जोडलेल्या आहेत. या ऐतिहासिक भूमीचे जतन करणे ही काळाची गरज होती.

दरम्यान, या ५ कोटींच्या निधीतून गडावरील ऐतिहासिक वास्तूंची दुरुस्ती आणि संवर्धन केले जाईल. तसेच, एका मोठ्या विकास आराखड्याच्या माध्यमातून गडाला ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या वैभवशाली स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संवर्धन कार्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याग आणि बलिदानाची साक्ष देणारा हा जाज्वल्य इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !