नगरपरिषदेच्या सोहळ्याआधीचं महायुतीकडून सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण

संगमनेर Live
0
नगरपरिषदेच्या सोहळ्याआधीचं महायुतीकडून सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण

◻️ पालकमंत्री विखे पाटील, आमदार खताळ यांच्या प्रयत्नातून मिळाला ९९ लाखाचा निधी

संगमनेर LIVE (अनिल शेळके) | महिलांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याबरोबरच शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणे आणि कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने संगमनेर शहरातील प्रमुख चौक तसेच अति संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा उभारण्यात आली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या  हस्ते सोमवारी सकाळी करण्यात आले. विशेष म्हणजे सायंकाळी नगरपरिषदेकडून अधिकृत भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्या आधीचं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकार्पण केल्यामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे.

महायुतीच्या दाव्यानुसार राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. संगमनेर शहरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौक तसेच अतिसंवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता असल्याची बाब आमदार अमोल खताळ यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती. महिला सुरक्षितता, चोरीच्या घटनांना आळा घालणे तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उपयुक्त ठरणार असल्याचे सांगत त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

आमदार खताळ यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा उभारण्यात आली आहे.
अकोले नाका, त्रिमूर्ती चौक, जनता नगर कॉर्नर, बसस्थानक कॉर्नर, चावडी चौक, तीन बत्ती चौक, चंद्रशेखर चौक तसेच नगरपालिकेच्या न्यायालयीन इमारतीजवळील परिसर आदी ठिकाणी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्ग आणि संवेदनशील भाग सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येण्यास मदत होणार आहे.

शहरात चोरी, छेडछाड, अपघात अथवा अन्य गुन्हेगारी घटना घडल्यास संबंधित घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग होणार आहे. तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रतिबंधात्मक परिणाम होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे उद्घाटन केले. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याबद्दल महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !