“शेअर बाजारात पैसे बुडवणाऱ्यांकडून माझी बदनामी व खंडणीचा कट”

संगमनेर Live
0
“शेअर बाजारात पैसे बुडवणाऱ्यांकडून माझी बदनामी व खंडणीचा कट”

◻️​ आमदार अमोल खताळांकडून पत्रकार परिषदेत विरोधकांचा समाचार तर, ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे सूतोवाच 

​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “शेअर बाजारात स्वतःचे आणि लोकांचे कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या एका व्यक्तीकडून राजकीय विरोधकांच्या पाठबळावर माझी सोशल मीडियावरून सातत्याने बदनामी केली जात आहे. केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी आणि खंडणी उकळण्याच्या हेतूने माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. मी अशा धमक्यांना आणि खालच्या पातळीवरील राजकारणाला भीक घालणार नाही; हिंमत असेल तर विरोधकांनी ईडी किंवा सीबीआय लावावी, मी सामोरे जाण्यास सज्ज आहे,” असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला. या संपूर्ण षड्यंत्राविरोधात न्यायालयात खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचे गुन्हे दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शहरातील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ​आमदार खताळ यांनी सोशल मीडियावरील बदनामीचे षड्यंत्र, खांडगाव येथील देवदर्शनादरम्यान झालेला हल्ल्याचा प्रयत्न, संगमनेर शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेवरून सुरू असलेला श्रेयवाद आणि तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट अशा विविध विषयांवर सविस्तर भूमिका मांडली.

​प्रसाद गुंजाळ या व्यक्तीकडून सुरू असलेल्या आरोपांचे खंडन करताना आमदार खताळ म्हणाले की, सदर व्यक्तीचा आणि माझा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. एका नोटरी व्यवहारात माझे नाव विनाकारण गोवले जात असून, त्या व्यवहारात मी साक्षीदारही नाही अथवा त्यात माझा पैशांचा कोणताही संबंध नाही. संबंधिताने संगमनेरातील अनेक नागरिकांचे पैसे बुडवले आहेत. त्यामुळे स्वतःची देणी चुकवण्यासाठी आणि लोकांचे पैसे परत करावे लागू नयेत म्हणूनच सहानुभूती मिळवण्याच्या हेतूने माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सार्वजनिक जीवनात काम करताना वाढदिवसाला किंवा जनसंपर्क कार्यालयात हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि पत्रकार भेटतात व फोटो काढतात; मात्र त्याचा असा विपर्यास करून वैयक्तिक कृत्यांशी संबंध जोडणे अत्यंत निंदनीय आहे. माझे सर्व बँक खात्यांचे स्टेटमेंट्स १०० टक्के पारदर्शक असून, मला कोणाचा एक रुपया देणे किंवा घेणे नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

​भूतकाळातील एका पत्राबाबत आमदार खताळ यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. संगमनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मथुरे यांच्या कार्यकाळात एका पैशांच्या वादात गुंजाळवर कारवाईची वेळ आली होती. त्यावेळी एका कार्यकर्त्याच्या विनंतीवरून केवळ सत्य परिस्थिती तपासून पुढे जाण्याच्या उद्देशाने शिफारस पत्र दिले होते. परंतु, आता आमदार झाल्यानंतर त्याच पत्राचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंग केले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने विरोधक अत्यंत खालच्या पातळीवर उतरले असून, ‘यशोधन’ कार्यालय आणि काही पराभूत विरोधकांच्या इशाऱ्यावरूनच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट तसेच ‘भावपूर्ण श्रध्दाजली’चे स्टेटस ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या सहा महिन्यांत ही व्यक्ती कोणाच्या संपर्कात होती, कोठून हे प्रकार नियंत्रित केले जात होते, याचे सर्व कॉल रेकॉर्ड्स (सीडीआर) व भक्कम पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

​गेल्या आठवड्यात खांडगाव येथे सहकुटुंब देवदर्शनासाठी गेलो असताना तिथेही कट रचून माझ्यावर कुटुंबासमोर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती आमदार खताळ यांनी दिली. सुदैवाने पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या प्रकरणावरून त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधीच्या बाबतीत पोलीस यंत्रणा ढिलाई दाखवत असल्याचा आरोप करत, पोलिसांनी संबंधित व्यक्तीचे मोबाईल फोन, व्हॉट्सॲप चॅट आणि सीडीआर तातडीने फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करावेत, अशी मागणी त्यांनी केली. 

स्थानिक प्रशासनाने वेळेत कडक कारवाई न केल्यास हा विषय थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मांडणार असल्याचे सांगत, या प्रकरणी गुंजाळ याला कायदेशीर नोटीस बजावण्याची प्रकृतीच्या सुरू असून, आता त्याच्या आईलाही नोटीस देऊन न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​शहरातील सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेबाबत बोलताना आमदार खताळ म्हणाले की, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून महायुतीने हा निधी मंजूर करून आणला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच लोकार्पण केले असताना, विरोधक मात्र केवळ नारळ फोडून कामाचे फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. विरोधकांनी स्वतःच्या हिमतीवर निधी आणावा आणि मगच श्रेय घ्यावे, आम्ही त्यांच्या कामांत कधीही अडथळा आणलेला नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचेच सरकार असल्याने संगमनेर तालुका आणि शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.

​संगमनेर तालुका क्रीडा संकुलाच्या बैठकीबाबत माहिती देताना आमदार खताळ यांनी क्रीडा विकासासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. २०१२ नंतर क्रीडा संकुल समितीची एकही बैठक झाली नव्हती, त्यामुळे दीर्घ खंडानंतर ही बैठक घेऊन रखडलेल्या कामांना गती देण्यात आली आहे. या बैठकीत २०१६ च्या शासकीय परिपत्रकानुसार समितीची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, मंजूर ३ कोटी रुपयांच्या प्रस्तावापैकी १ कोटी रुपयांचा निधी तात्काळ नगरपरिषदेकडे वर्ग करण्याच्या सूचना क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

​याशिवाय शहरातील संकुलाव्यतिरिक्त ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंची गरज लक्षात घेऊन तालुक्यात ५ ते १० एकर जागेत आणखी एक भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, महसूल विभागाला तत्काळ जागा शोधण्याचे निर्देश दिले आहेत. 

दरम्यान, संकुलावर आवश्यक ती पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. स्थानिक तरुणांमधील क्रीडा गुणांना वाव मिळवून देण्यासाठी संगमनेरमध्ये लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, सर्वांनी समन्वयाने या स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेच्या समारोपप्रसंगी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !