राहाता तालुका तत्काळ ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करा - सौ. प्रभावती घोगरे

संगमनेर Live
0
राहाता तालुका तत्काळ ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करा - सौ. प्रभावती घोगरे

◻️ ​पावसाने ओढ दिल्याने पिके करपली; काॅग्रेसचे तहसीलदारांना निवेदन!


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | चालू खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने राहाता तालुक्यातील शेतकरी भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी उद्भवलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने राहाता तालुका तत्काळ ‘दुष्काळग्रस्त’ घोषित करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिष्टमंडळासह राहाता तहसीलदारांना सविस्तर निवेदन दिले.

राहाता ​तालुक्यात पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कांदा व भाजीपाल्यासह डाळिंब आणि द्राक्षांच्या फळबागांना मोठा फटका बसला आहे. आवश्यक पाणी मिळत नसल्याने पिके वाळून उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. ऐन हंगामात हाता तोंडाशी आलेली पिके करपून गेल्याने आगामी रब्बी हंगामावरही अनिश्चिततेचे सावट पसरले असून बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

​या गंभीर पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने दिरंगाई न करता महसूल व कृषी विभागामार्फत नुकसानग्रस्त सर्व पिके व फळबागांचे तातडीने संयुक्त सर्वेक्षण करून पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विनाविलंब पाठवण्यात यावा, तसेच बाधित शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई, थेट आर्थिक मदत आणि शासनाच्या सर्व दुष्काळी सवलतींचा लाभ मिळवून द्यावा. यासोबतच ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न व पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने टॅकरसह योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता प्रशासनाने या मागण्यांची त्वरित दखल घेऊन बळीराजाला दिलासा द्यावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सौ. प्रभावती घोगरे यांनी यावेळी दिला.

दरम्यान, ​याप्रसंगी लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन चौगुले, लोणी खुर्द सेवा सोसायटीचे चेअरमन भास्कर आहेर, राजेंद्र निर्मळ, महेश आहेर, राजेंद्र जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !