आमदार खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदत व पंचनाम्यांची मागणी

संगमनेर Live
0
आमदार खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदत व पंचनाम्यांची मागणी

◻️ संगमनेर तालुक्यात पावसाच्या खंडाने बळीराजा संकटात; ३३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | चालू खरीप हंगामात पावसाने दिलेल्या प्रदीर्घ ओढ आणि अनियमिततेमुळे संगमनेर तालुक्यातील शेती संकटात सापडली आहे. संगमनेर तालुक्यातील तब्बल ४०.३५ टक्के म्हणजेच ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरिपाची पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार अमोल खताळ पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची आणि कृषी पथकामार्फत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पीक पाहणी करण्याचे आदेश देण्याची आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

​तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी आणि विविध कडधान्यांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांची उगवण उत्तम झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने ऐन वाढीच्या आणि दाणे भरण्याच्या काळात पिकांना पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. प्रखर ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे पिके जागच्या जागी जळून जाण्याच्या उंबरठ्यावर असून, उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

​या पार्श्‍वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना सांगितले की, पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आधीच दुप्पट झाला आहे; त्यातच पीक हातातून गेल्यास शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन तातडीने पीक पाहणी व पंचनामे करावेत, तसेच या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करून बाधित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, शासकीय सवलती आणि नुकसानभरपाईच्या योजनांचा तात्काळ लाभ मंजूर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

​कृषी विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील चार कृषी मंडलांत एकूण ८३ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्यातील ३३ हजार ७९२.५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये कोकणगाव कृषी मंडलाला सर्वाधिक फटका बसला असून, तेथील २५ हजार ४८२ हेक्टरपैकी तब्बल १६ हजार २०० हेक्टर (६३.५७ टक्के) पिके धोक्यात आली आहेत. साकूर मंडलात २२ हजार १४ हेक्टरपैकी १० हजार ३४६ हेक्टर (४७ टक्के), घारगाव मंडलात १६ हजार ८०७ हेक्टरपैकी ६ हजार १११.५ हेक्टर (३६.३६ टक्के), तर संगमनेर मंडलात १९ हजार ४३८ हेक्टरपैकी १ हजार १३५ हेक्टर (५.८४ टक्के) क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत.

​“शेतकरी आधीच वाढत्या उत्पादन खर्चाने मेटाकुटीस आला आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने कोणत्याही तांत्रिक अडचणीत न अडकवता संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा देणे गरजेचे आहे.” असे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !