शहागडाचा ऐतिहासिक वारसा घराघरापर्यंत पोहोचवा - सौ. नीलम खताळ
◻️ पेमगिरी येथे ‘हिंदवी स्वराज्य संकल्प दिन’ उत्साहात साजरा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडाला मोठा आणि देदीप्यमान वारसा लाभलेला आहे. हा गौरवशाली इतिहास केवळ पेमगिरी किंवा संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित न ठेवता तो अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे ही काळाची गरज आहे. शहागडाच्या विकासाचा ध्यास आमदार अमोल खताळ यांनी घेतला असून, हा गड वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी गावकऱ्यांनी स्थानिक राजकारण, मतभेद आणि गट-तट बाजूला ठेवून एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन आदिशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. नीलम खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर आयोजित ‘हिंदवी स्वराज्य संकल्प दिना’निमित्त त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या सोहळ्याला शिवचरित्रकार डॉ. संदीप महिंद, ॲड. किरण झिंजुरके, प्रमोद राहणे, सौ. अंजली देशमुख, सौ. वर्षा डुबे यांच्यासह परिसरातील महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना सौ. खताळ म्हणाल्या की, शहागडाच्या विकासासाठी निधी आणि नियोजनात आमदार अमोल खताळ कोणतीही तडजोड करणार नाहीत. शहागडाच्या प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात झाली असून, गडाच्या ऐतिहासिक भिंतींच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच पर्यटन विभागाच्या मान्यतेने आगामी नवरात्रोत्सवापर्यंत येथे तीन दिवसीय भव्य ‘हिंदवी स्वराज्य संकल्प दिन’ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडेल. या प्रकल्पामुळे भविष्यात शहागडावर पर्यटकांचा ओघ वाढून संपूर्ण पेमगिरी परिसराच्या अर्थकारणाला आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. असे नमूद केले.
“शहाजीराजे भोसले यांनी वेरूळ येथून सुमारे २५० किलोमीटरचा खडतर प्रवास करून पेमगिरीच्या शहागडावर स्वराज्य संकल्प सोडला होता. हा अथांग इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता हा इतिहास जनमानसात रुजवला पाहिजे. पुढील वर्षी शहागडावर शहाजीराजांची केवळ प्रतिमा न ठेवता त्यांची सन्मानपूर्वक मूर्ती घडवून ती पालखीतून गडावर आणली जावी.” असे आवाहन शिवव्याख्याते डॉ. संदीप महिंद यांनी केले.